माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी नोटाबंदीवरुन पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ‘देशातील संपूर्ण काळा पैसा नष्ट झाला असेल, तर मग पंजाब आणि उत्तर प्रदेशात निवडणुकीदरम्यान इतक्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम कशी काय जप्त होते आहे?,’ असा प्रश्न चिदंबरम यांनी उपस्थित केला आहे. ‘देशातील काळा पैसा नष्ट झाला आहे का? मग उत्तर प्रदेशमधून जप्त करण्यात आलेले १२१ कोटी रुपये आणि पंजाबमधून हस्तगत करण्यात आलेले ७० कोटींची रोख रक्कम काळा पैसा नाही का?’, असाही सवाल चिदंबरम यांनी विचारला आहे.

‘नेहमी भारतीय रिझर्व्ह बँक सरकारकडे शिफारस करते. मात्र आता सरकारकडून रिझर्व्ह बँकेकडे शिफारस केली जाते आहे. १० संचालकांऐवजी २ संचालक बैठकीत सहभागी होतात. आजही एटीएम मशीन पूर्ण क्षमतेने काम करत नाहीत. रोख रकमेची चणचण जाणवते आहे. जर तुम्ही नोटांचा आकार बदलला आहे, तर एटीएम मशीन निरुपयोगी ठरतात. एटीएममधून हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा निघायच्या. मात्र तुम्ही दोन हजारांच्या नोटा आणल्याने एटीएम मशीनचे रिकॅलिब्रेशन करावे लागले,’ असेही चिदंबरम यांनी म्हटले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी नोटाबंदीच्या निर्णयावरुन याआधीही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ‘नोटाबंदी हा सर्वात मोठा घोटाळा आहे. यामुळे गरिब आणि शेतकऱ्याला सर्वात जास्त त्रास झाला आहे. नोटाबंदी हा वर्षातील सर्वात मोठा घोटाळा असल्याने त्याची चौकशी व्हायला हवी. १५ लाख आले तर मग काळा पैसा कुठे जाणार? सर्वकाही पूर्वपदावर येण्यास ७ महिने लागतील. नोटाबंदीचा निर्णय म्हणजे डोंगर पोखरुन उंदीर काढण्यासारखा आहे,’ असे चिदंबरम यांनी म्हटले आहे. ‘नोटाबंदीमुळे काळा पैसा संपुष्टात आला का?, नोटाबंदीमुळे भ्रष्टाचार थांबला का?, दहशतवाद्यांना मिळणारी आर्थिक मदत थांबली का?,’ असे अनेक प्रश्न चिदंबरम यांनी उपस्थित केले होते.