उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष कृती दलाने (एसटीएफ) शुक्रवारी मेरठ येथे मोहम्मद एजाज उर्फ मोहम्मद कलाम या पाकिस्तानी व्यक्तीला अटक केली. पाकिस्तानच्या आयएसआयला भारतीय लष्कराशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती पुरवल्याचा आरोप एजाजवर आहे. तो डिसेंबर २०१४ पासून बरेली येथे वास्तव्याला होता.
एजाज छायाचित्रण आणि व्हिडिओग्राफीद्वारे माध्यमातून भारतीय लष्काराची माहिती गोळा करत होता. या कामासाठी एजाजला आयएसएसकडून आत्तापर्यंत ५.८ लाख रूपये मिळाले होते. याशिवाय, पाकिस्तानमध्ये असणाऱ्या त्याच्या कुटुंबाला आयएसएसकडून प्रत्येक महिन्याला ५०००० रूपये मिळत असल्याची माहिती चौकशीतून पुढे आली आहे.
एजाज हा पाकिस्तानातील इस्लामाबदचा रहिवाशी असून शुक्रवारी दिल्लीला जात असताना मेरठ येथे पोलिसांनी त्याला अटक केली. यावेळी पोलिसांना त्याच्याकडे भारतीय लष्कराशी संबंधित कागदपत्रे, मोबाईल, लॅपटॉप, पेन ड्राईव्ह आणि पश्चिम बंगालचे बनावट मतदार ओळखपत्र आणि बनावट आधार कार्ड सापडले. याशिवाय, पोलिसांना त्याच्याजवळून पाकिस्तानी रहिवाशी असल्याचा पुरावा असणारे नादार कार्डही मिळाले. दरम्यान, एजाजला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने आयएससाठी काम करत असल्याचे मान्य केले. २०१२ मध्ये तो आयएसआयच्या संपर्कात आला त्यानंतर आयएसएसकडून एजाजला भारतात काम करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले. तो आयएसएसला पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील भारतीय लष्कराची माहिती पुरवत होता, असे ‘एसटीएफ’चे अधिकारी सुजीत पांडे यांनी सांगितले.
भारतीय लष्कराची माहिती मिळवण्यासाठी बांगलादेशमधून एका पाकिस्तानी व्यक्तीला उत्तर प्रदेशात पाठविण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी कारवाई करत एजाजला अटक केली.