भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचा बदला घेण्यासाठी कानपूर येथे रेल्वे दुर्घटना घडवण्यात आल्याचे बिहार पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे. बिहार पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांनी असा जबाब दिल्याचे सांगितले जाते. रेल्वे दुर्घटनांबाबत या संशयितांनी दिलेल्या माहितीमध्ये इंदूर-पाटणा एक्स्प्रेस आणि सियालदेह-अजमेर एक्स्प्रेसच्या अपघाताचाही समावेश आहे. कानपूर येथे झालेल्या या दोन्ही रेल्वे अपघातात १५० हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला होता. उमाशंकर पटेल, मोतिलाल पासवान आणि मुकेश यादव असे पोलिसांनी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत. या तिघांना मंगळवारी (दि. १७) मोतिहारी येथून अटक करण्यात आली होती. ऑक्टोबरमध्ये बिहारमधील घोराशन स्थानकावर कुकर बॉम्ब लावल्याचा या तिघांवर आरोप आहे. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान या तिघांनी कानपूर येथे रूळावरून घसरून झालेल्या रेल्वे अपघातांची माहिती दिली. त्यांनीच हा अपघात घडवला होता.

यापूर्वी नेपाळ पोलिसांच्या हाती आयएसआयचा हँडलर ब्रिजकिशोर गिरी लागला होता. त्याच्याबरोबर शंभु गिरी आणि मुजाहिर अन्सारी यांनाही ताब्यात घेण्यात आले होते. या तिघांना नेपाळमधून अटक करण्यात आली होती. आयएसआयच्या समशूल हुडा याच्याकडून गिरीला पैसे मिळत. हुडा हा नेपाळमध्येच राहतो. तो दोन वर्षांपूर्वी दुबईला गेला आहे. नेपाळ पोलिसांकडून त्याला दुबईवरून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार गिरीने या लोकांना सर्जिकल स्ट्राइकनंतर बदला घेण्यासाठी लगेचच काही तरी करण्यास सांगितले होते, असे एका गुप्तचर अधिकाऱ्याने सांगितले.
ज्या हँडलर्सच्या मदतीने या तीन लोकांना पकडण्यात आले त्यावरून असे वाटते की, हा रेल्वे अपघात पूर्वनियोजित कटाचाच भाग होता. दि. २९ सप्टेंबर रोजी हुडाबरोबर फोनवर चर्चा झाल्याचे अन्सारीने नेपाळ पोलिसांना सांगितले होते. नेपाळच्या बारा जिल्ह्यात कार्यरत असलेल्या अरूण कुमार कुशवाहकडून बिहार पोलिसांना याबाबत माहिती मिळाली होती.