जगभरातील अनेक देशांच्या नेत्यांनी लंडनमधील दहशतवादी हल्ल्याचा एकमुखी निषेध केला असून, आपण दहशतवादाच्या विरोधात ब्रिटनसोबत असल्याचे त्यापैकी अनेकांनी म्हटले आहे.

जर्मनी ‘ठामपणे व दृढनिर्धाराने’ ब्रिटनसोबत उभा असल्याचे जर्मनीच्या चांसलर अँजेला मर्केल म्हणाल्या. या कृत्याची पाश्र्वभूमी अद्याप स्पष्ट झालेली नसली, तरी सर्व प्रकारच्या दहशतवादी कृत्यांच्या विरोधातील लढय़ात जर्मनी व तिचे नागरिक ब्रिटिश नागरिकांसोबत दृढपणे उभे आहेत, असे त्यांनी एका निवेदनात सांगितले. अध्यक्ष फ्रँक- वाल्टर स्टाईनमेअर यांनीही याच भावना व्यक्त केल्या.

ब्रिटिश लोक व थेरेसा मे यांच्याशी ‘ऐक्य’ व ‘पाठिंबा’ व्यक्त करणारा संदेश फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँक्वा ओलांद यांनी पाठवला. अलीकडच्या काळात दहशतवादाचे जबर फटके बसलेल्या फ्रान्सला ब्रिटिश लोकांना आज काय सोसावे लागत आहे याची जाणीव आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रेक्स टिलरसन यांनीही हल्ल्यात बळी पडलेले लोक व त्यांच्या कुटुंबीयांबाबत सहानुभूती व्यक्त करताना हिंसाचाराच्या भीषण कृत्यांचा निषेध केला. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टड्रो यांनीही कॅनडाचे लोक ब्रिटनच्या नागरिकांसोबत असल्याची ग्वाही दिली आहे.

युरोपीय आयोगाचे अध्यक्ष जीन- क्लॉड जंकर यांनी या हल्ल्यामुळे आपण अतीव दु:खी झाल्याचे सांगितले. तर युरोपीय परिषदेचे अध्यक्ष डोनाल्ड टस्क यांनी दहशतवादाच्या विरोधात युरोप ब्रिटनसोबत असल्याचे सांगून मदतीची तयारी दर्शवली.

मोदींकडून निषेध

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लंडनमधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला असून या हल्ल्यामुळे आपल्याला अतीव दु:ख झाल्याचे म्हटले आहे. हल्ल्यात बळी पडलेले लोक व त्यांच्या कुटुंबीयांबाबत शोकसंवेदना व्यक्त करतानाच, या कसोटीच्या प्रसंगी दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारत ब्रिटनसोबत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आयफेल टॉवर

ब्रिटिश संसदेच्या बाहेरील दहशतवादी हल्ल्यात ठार व जखमी झालेल्या लोकांबाबत ऐक्यभावना व्यक्त करण्यासाठी पॅरिसमधील जगप्रसिद्ध आयफेल टॉवरवरील दिवे गुरुवारी मध्यरात्री बंद ठेवण्यात आले. पॅरिसच्या महापौर अ‍ॅनी हिडाल्गो यांनी याबाबत निर्णय घेतला.