इसिसमध्ये भरती करण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजाविणारा आणि तज्ज्ञ ब्रिटिश हॅकर जुनैद हुसेन हा सीरियात अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारला गेला आहे.
बर्मिगहॅममध्ये जन्मलेल्या हुसेनने नोम डे ग्युएर अबू हुसेन अल-ब्रिटनी असे नाव धारण केले होते आणि तो इसिसमध्ये सायबर खलिफा म्हणून ओळखला जात होता. तो सीरियात २०१३ मध्ये गेला होता आणि ड्रोन हल्ल्यात मारला गेला.
हुसेन ड्रोन हल्ल्यात मारला गेल्याच्या निष्कर्षांप्रत अमेरिकेच्या लष्करी आणि गुप्तचर यंत्रणा आल्या आहेत, असे असे एका दूरचित्रवाणी वाहिनीने म्हटले आहे. हुसेन ठार झाला असल्याचा आम्हाला विश्वास आहे, असे अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. इसिसची स्वयंघोषित राजधानी असलेल्या राक्का येथे करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यात हुसेन ठार झाला. सीरियाच्या उत्तरेकडे राक्का असून तो इसिसचा बालेकिल्ला आहे. सीरियात हुसेन फिरत असलेल्या वाहनालाच लक्ष्य करण्यात आले, त्याबाबतची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली होती आणि तो वाहनात असल्याची खात्री केल्यानंतरच ड्रोन हल्ला करण्यात आला, असे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.