आयसिससाठी काम करण्याचा आरोप असलेला सुबहानी हाजा मोईदीन हा भारतीय हस्तक गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात पॅरिसमध्ये शंभरहून अधिक लोकांचे बळी घेणाऱ्या एका थिएटरमधील हल्ला घडवून आणणाऱ्यांना ओळखत होता; मात्र या भीषण हल्ल्याची मात्र आपल्याला माहिती नसल्याची बतावणी तो करत असल्याचे तपासात आढळले आहे.

राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने केंद्रीय सुरक्षा दले आणि इतर राज्यांतील पोलिसांच्या मदतीने केलेल्या कारवाईत मोइदीन याला तामिळनाडूतून अटक केली होती. यामुळे केरळमधील काही न्यायाधीश आणि केरळमध्ये येणाऱ्या विदेशी पर्यटकांना लक्ष्य करण्याचे आयसिसच्या दहशतवाद्यांचे बेत उधळले गेले होते. तिरुनेलवेली येथून अटक करण्यात आलेल्या मोइदीनचे आयसिसने समाजमाध्यमांतून कट्टरीकरण करून त्याला संघटनेत सहभागी करून घेतले होते. गेल्या वर्षी ‘उमराह’ करण्याच्या बहाण्याने तो चेन्नईहून इस्तंबूलला गेला होता, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. इस्तंबूलला पोहोचल्यानंतर मोइदीन पाकिस्तान व अफगाणिस्तानच्या लोकांसोबत आयसिसच्या नियंत्रणाखाली क्षेत्रात घुसला. त्याच ठिकाणी पॅरिसमध्ये बाँबहल्ला करणाऱ्या अब्देलहमीद अबाऊद आणि सलाह अब्देस्लाम यांच्याशी आपली भेट झाल्याचा त्याचा दावा आहे.