दिल्ली विद्यापीठातील भिंतीवर आयसिसच्या समर्थनार्थ फलक लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आयसिससोबतच नक्षलवादाला पाठिंबा दर्शवणारे संदेश भिंतीवर लिहीण्यात आले असून याप्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) पदाधिकाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

दिल्ली विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाच्या इमारतीजवळील भिंतीवर शनिवारी आयसिस या दहशतवादी संघटनेचे समर्थन करणारा मजकूर लिहील्याचे समोर आले. याप्रकरणी अभिवापचे सदस्य आणि विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचे सचिव अंकीतसिंह सागवान यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. ‘अज्ञात व्यक्तींनी इमारतीच्या भिंतीवर आक्षेपार्ह संदेश लिहील्याची तक्रार माझ्याकडे आली होती. मी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता भिंतीवर ‘मी आयसिसचा समर्थक’ असे लिहील्याचे माझ्या निदर्शनास आले. याशिवाय नक्षलवाद्यांना न्याय मिळवून द्या, आझादी अशा आशयाचा मजकूरही भिंतीवर लिहीण्यात आला होता. पण मला त्या मजकूराची भाषा समजली नाही’ असे अकींतसिंह यांनी तक्रारीत म्हटले आहे. भिंतीवर आक्षेपार्ह मजकूर लिहीणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. ‘आमच्याकडे तक्रार आली असून आम्ही या घटनेचा तपास सुरु आहे’ असे दिल्लीतील पोलीस उपायुक्त जतीन नरवाल यांनी सांगितले.