आयसिस या दहशतवादी संघटनेसाठी तरुणांची भर्ती करणे आणि त्यांना पैसा पुरवणे या आरोपांखाली देशाच्या निरनिराळ्या भागांतून अटक करण्यात आलेल्या ४ संशयित दहशतवाद्यांची कोठडी १७ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.
मोहम्मद नफीस खान, नजमुल हुडा, मुदब्बीर मुश्ताक शेख आणि मोहम्मद अब्दुल अहद यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले. हे लोक आयसिसच्या इतर सूत्रधारांसह कट रचण्यात सहभागी होते, असा आरोप ठेवून एनआयएने त्यांच्या कोठडीची मुदत सात दिवसांनी वाढवण्याची विनंती केली.
आरोपींपैकी नफीसच्या घरून आक्षेपार्ह कागदपत्रांशिवाय अमेरिकी डॉलर्स, सौदी रियाल आणि भारतीय चलन जप्त करण्यात आले, तर मुदब्बीरजवळ १,९५,००० रुपये सापडले.
शिवाय एका परदेशी सूत्राकडून आपल्याला पाच लाख रुपये मिळाल्याचे त्याने तपासात कबूल
केले. ही रक्कम त्याने भारतात आयसिसच्या कारवायांचा प्रसार करण्यासाठी वापरली. याशिवाय आरोपींकडून मोठय़ा प्रमाणात इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड जप्त करण्यात आला असल्याचे एनआयएने न्यायालयाला सांगितले.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हा न्यायाधीश अमरनाथ यांनी चारही संशयित आरोपींची एनआयए कोठडी पाच दिवसांनी, म्हणजे १७ फेब्रुवारीपर्यंत वाढवली.