इसिसने जपानच्या ज्या मुक्त पत्रकाराला ओलीस ठेवले आहे त्याला सोडून द्यावे कारण जॉर्डनमधील गुप्त चर्चेत त्या देशानेही तसेच म्हटले आहे, जॉर्डनच्या ओलीस वैमानिकाला सोडण्याचीही मागणी करण्यात आली आहे, असे जपानचे पंतप्रधान शिन्झो अ‍ॅबे यांनी म्हटले आहे. दरम्यान इसिसने या दोघांना चोवीस तासांत ठार मारण्याची धमकी दिली आहे.
 जपानी मुक्त पत्रकार केन्जी गोटो व जॉर्डनचा वैमानिक लेफ्टनंट मुआथ अल कसाबेह यांना लवकरात लवकर सोडून देण्याची मागणी करण्यात आली आहे. इसिसने मात्र त्यांना ठार मारण्याचा निर्वाणीचा इशारा दिला असून दोन्ही ओलिसांना जॉर्डनमध्ये शिक्षा सुनावलेली इराकी महिला साजिदा अल रिशावी हिला सोडून न दिल्यास चोवीस तासांत ठार मारण्यात येईल, असे इसिसने म्हटले आहे. २००५ मधील दहशतवादी हल्ल्यात ६० लोक मारले गेले होते त्यात रिशावी हिचा हात होता. इसिसचे वागणे संतापजनक असल्याचे आम्ही त्याचा निषेध करतो असे अ‍ॅबे यांनी म्हटले आहे. अतिशय कठीण असा हा प्रसंग आहे त्यात जॉर्डन सरकारनेच आता गोटो या पत्रकाराला सोडवण्यासाठी मदत करावी असे त्यांनी सांगितले. दरम्यान जॉर्डनमधील वैमानिक सैफ अल कसाबेह म्हटले आहे की, सरकारने इसिसच्या मागण्या पूर्ण कराव्यात. त्याच्या दोनशे नातेवाईकांनी जॉर्डनची राजधानी अम्मान येथे सरकारविरोधी घोषणा देत अपहरणकर्त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात असे सांगितले. ओलिसांच्या सुटकेसाठी सरकारचे अप्रत्यक्ष चर्चेतून प्रयत्न सुरू आहेत असे जॉर्डनच्या एका संसद सदस्याने सांगितले. गोटोच्या बदल्यात अल रिशावीच्या सुटके साठी थेट वाटाघाटी जॉर्डन व जपान यांनी करू नये असे इराकचे मत आहे. जपानचे उपपरराष्ट्र मंत्री यासुहिडे नाकायामा यांनी ओलिसांच्या सुटकेसाठी जॉर्डनमध्ये जाऊन प्रयत्न सुरू केले आहेत. इराकमधील आदिवासी नेत्यांच्या मार्फत ओलिसांशी वाटाघाटी सुरू असल्याचे समजते.