सीरियात दहशतवादी कारवायांनी धुमाकूळ घालणा-या इसिसच्या क्रूरकृत्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. इसिसने जाहीर केलेल्या नवीन व्हिडीओत १० ते १३ वर्षांच्या पाच लहान मुलांनी कुर्दीश कैद्यांची गोळ्या झाडून हत्या केली आहे. यातील एक मुलगा ब्रिटनमधील असून या व्हिडीओमुळे इसिसने १६ वर्षांखालील मुलांनाही दहशतवादी कारवायांमध्ये सामील करुन घेतल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
सीरियातील इसिसची राजधानी रक्का येथे काही दिवसांपूर्वी पाच कुर्दीश कैद्यांना मृत्यूदंड देण्यात आला. या कैद्यांना मृत्यूदंड देण्याचे काम पाच लहान मुलांना देण्यात आले होते. ही पाच मुलं ब्रिटन, इजिप्त, तुर्कीस्तान, ट्यूनिशिया आणि उझबेकिस्तानमधून इसिसमध्ये भरती झाल्याचे समोर आले आहे. इसिसचा गणवेश आणि हातात गन घेतलेल्या या मुलांनी मृत्यूदंड देण्यापूर्वी कुर्दीश लोकांना कोणीही वाचवू शकणार नाही असा इशाराही दिला आहे. अरबी भाषेतला या व्हिडीओमुळे खळबळ माजली आहे.
कुर्दीश कैद्यांची हत्या करणा-या पाच मुलांपैकी एका मुलाची ओळख पटली आहे. अबू अब्दुल्ला अल ब्रितानी असे या मुलाचे नाव असून तो १२ वर्षांचा आहे. इसिसमध्ये ब्रिटनमधून भरती होणा-या तरुणांसाठी अल ब्रितानी हा गटच तयार करण्यात आल्याचे जाणकारांनी सांगितले. गेल्या काही वर्षांत ब्रिटनमधील तब्बल ५० अल्पवयीन मुलांनी इसिसमध्ये प्रवेश केल्याची माहिती एका संस्थेने दिली आहे. मनुष्यबळाची उणीव भरुन काढण्यासाठी इसिसने आता हल्ले करण्यासाठी अल्पवयीन मुलांना प्रशिक्षण दिले आहे. १० ते १२ वर्षांच्या या मुलांना इसिसचे लष्करी प्रशिक्षण दिले जात आहे. या कालावधीत त्यांना बाहेरच्या जगाशी संपर्क साधू दिला जात नाही. त्यांना प्रशिक्षणादरम्यान सातत्याने जिहादविषयक साहित्य आणि व्हिडीओ बघायला दिली जातात. त्यामुळे या लहान मुलांना रोखण्याचे आव्हान आता सुरक्षा यंत्रणांसमोर असणार आहे.