इजिप्तने इस्रायल व पॅलेस्टिनी दहशतवादी गट यांच्यात घडवून आणलेल्या ७२ तासांच्या शस्त्रसंधीच्या अंमलबजावणीस सकाळपासून सुरुवात झाली. त्या अगोदर हमासने इस्रायलवर रॉकेटचा मारा केला. स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी आठ वाजता शस्त्रसंधीला सुरुवात झाली. त्यापूर्वी इस्रायलने केलेल्या हत्याकांडांच्या निषेधार्थ हमासने रॉकेटचा मारा केला.
अशदोद, अ‍ॅशकेलॉन, सदॉत हानेगेव, किरयात, मलाशी रेहव्होट, रिशन लेझियॉन, गेडेरा, लॉड, रामले, जेरूसलेमच्या पूर्वेकडील माले ऑडय़ुमिम या शहरात धोक्याचे भोंगे वाजवण्यात आले, गाझाने सोडलेली सतरा पैकी सहा रॉकेट भेदण्यात यश आले. रॉकेटमुळे किरकोळ नुकसान झाले. इस्रायली दलांनीही तोफगोळ्यांचा मारा करून प्रत्युत्तर दिले. दरम्यान, इस्रायल संरक्षण दलाच्या प्रवक्तयाने सांगितले, की गाझामधील सैन्य मागे घेण्यात येईल. कर्नल पीटर लर्नर यांनी सांगितले, की गाझा पट्टय़ात सैन्याची फेरजुळणी करण्यात येत आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी मंगळवारी सकाळी मंत्रिमंडळाच्या बैठकीस सांगितले, की हमास बरोबर तीन दिवसांची शस्त्रसंधी आपण स्वीकारली आहे. दोन्ही गटांनी शस्त्रसंधीचे पालन करावे असे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांनी म्हटले आहे. दोन्ही गटांनी चर्चेसाठी कैरोला येऊन तोडगा काढावा असे मून यांनी सांगितले असून इस्रायलचे शिष्टमंडळ केव्हा तिकडे जाणार हे समजू शकले नाही. इस्रायलने रविवारी शिष्टमंडळ पाठवण्यास नकार दिला पण इजिप्तच्या पुढाकाराने शस्त्रसंधी मान्य केली.