भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) पीएसएलव्ही सी-३५ या प्रक्षेपकाच्या मदतीने स्कॅटसॅट-१ या हवामान उपग्रहासह आठ उपग्रह सोमवारी अवकाशात सोडून एक नवा इतिहास लिहिला. मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘प्रथम’ या उपग्रहासह अन्य देशांच्या पाच उपग्रहांचा त्यात समावेश आहे. हे उपग्रह वेगवेगळ्या कक्षांत सोडण्यात आले असून, अवकाशयानाने आत्तापर्यंत सर्वाधिक लांबचे उड्डाण केल्याने इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

पीएसएलव्ही सी-३५ हे ४४.४ मीटर उंचीचे अवकाशयान येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सोमवारी सकाळी ठीक ९.१२ वाजता अवकाशात झेपावले. स्कॅटसॅट १ हा ३७१ किलो वजनाचा उपग्रह १७ मिनिटांत ७५० किमीच्या सूर्यसापेक्ष कक्षेत सोडण्यात आला. नंतर इतर उपग्रहही दोन तास १५ मिनिटांत अवकाशात सोडण्यात आले. उपग्रहांचे वजन ६७५ किलो होते. उपग्रह वेगवेगळ्या कक्षांत प्रस्थापित करण्यासाठी चार टप्प्यांच्या दोन इंजिनांचा वापर करण्यात आला. या कक्षांमध्ये एक किमीचा फरक होता, अशी माहिती विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे संचालक के. सिवान यांनी दिली.

स्कॅटसॅट-१ची उपयुक्तता 

स्कॅटसॅट १ हा ओशनसॅट १ स्कॅटरोमीटर मोहिमेतील पूरक उपग्रह आहे. हवामान अंदाज, चक्रीवादळ अंदाज या उपग्रहाद्वारे मिळतील. या उपग्रहाचे आयुर्मान पाच वर्षे आहे.

वैशिष्टय़े..

  • आयआयटी मुंबईचा ‘प्रथम’, बंगळुरूच्या बीईएस विद्यापीठाचा ‘पीसॅट’ हे उपग्रहही अवकाशात सोडण्यात आले. प्रथमचा उद्देश ‘टोटल इलेक्ट्रॉन काऊंट’ हा असून, ‘पीसॅट’ हा दूरसंवेदन प्रकारातील नॅनो उपग्रह आहे.
  • अलसॅट १ एन हा विद्यार्थ्यांनी तयार केलेला तंत्रज्ञान उपग्रह आहे. पाथफाइंडर १ हा अमेरिकेचा अधिक विवर्तन शक्ती असलेला उपग्रह आहे.
  • कॅनडाचा एनएलएस १९ हा तंत्रज्ञान उपग्रह अवकाशातील कचरा कमी करण्यासाठी व व्यावसायिक विमानांवर लक्ष ठेवण्यासाठी त्याचा वापर होणार आहे.

मोहिमेतील आव्हाने अशी होती..

  1. या मोहिमेला दोन तासांहून अधिक काळ लागला. कमी गुरुत्वात उपग्रह वेगवेगळ्या कक्षांत सोडण्यात आले. त्यासाठी अवकाशात इंजिन दोनदा प्रज्वलित करावे लागले.
  2. प्रक्षेपक व उपग्रह यांची वातावरणातील घर्षणामुळे होणारी हानी टाळण्यासाठी उष्णतारोधक कवच वापरण्यात आले.
  3. पीएसएलव्हीचे इंजिन एक तासात दुसऱ्यांदा सुरू करण्यात आले. प्रक्षेपक-इंजिन या मधल्या काळात थंड होऊ द्यावे लागते. एकाच वेळी असे करणे अवघड असते.

इस्रोचे लक्ष्य

इस्रो ऑक्टोबरमध्ये ‘जीसॅट १८’ हा उपग्रह सोडणार आहे. तसेच ‘जीएसएलव्ही मार्क ३’ या वर्षांच्या अखेपर्यंत सोडण्यात येणार आहे. ‘रिसोर्ससॅट २ ए’ हा उपग्रह नोव्हेंबरमध्ये अवकाशात सोडण्याचे इस्रोचे लक्ष्य आहे.

सोमवारच्या मोहिमेचा कालावधी

  • २ तास १५ मिनिटे ३३ सेकंद

हे उपग्रह झेपावले..

‘स्कॅटसॅट-१’ (भारताचा हवामान उपग्रह – ३७१ किलो), ‘प्रथम’ (मुंबई आयआयटी विद्यार्थ्यांनी घडवलेला उपग्रह – १० किलो), ‘पीसॅट’ (बंगळुरू येथील बीएसई विद्यापीठ – ५.२५ किलो), ‘अलसॅट-१ बी’, ‘अलसॅट-२ बी’, ‘अलसॅट-१ एन’ (अल्जेरिया), ‘पाथफाइंडर-१’ (अमेरिका), ‘एनएलएस-१९’ (कॅनडा)

आजच्या यशस्वी प्रक्षेपणामुळे इस्रोने एकाचवेळी दोन कक्षांत उपग्रह सोडण्याची क्षमता सिद्ध केली आहे. त्यामुळे इस्रोला यापुढे आणखी व्यावसायिक फायदा होईल.

डॉ. के.सिवान, संचालकविक्रम साराभाई स्पेस सेंटर.