भारतीय अवकाश संशोधन संस्था उद्या बुधवारी वीस उपग्रह श्रीहरिकोटा येथून एकाच वेळी अवकाशात सोडणार असून, त्यात गुगल कंपनीचा उपग्रह व भारतीय विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या दोन उपग्रहांचा समावेश आहे. पीएसएलव्ही प्रक्षेपकाचे हे ३६वे उड्डाण असून तो २० उपग्रह अवकाशात सोडणार आहे. शिवाय इतर अवकाश संस्थांच्या दहापट कमी खर्चात ही मोहीम राबवली जात आहे. भारत-अमेरिका मैत्रीचे प्रतीक म्हणून तेरा अमेरिकी उपग्रह भारत सोडणार असून, त्यात गुगल कंपनीचा स्काय सॅट जन २ हा टेरा बेला कंपनीने तयार केलेला उपग्रह आहे. त्यातून स्पष्ट व्हिडिओ चित्रण शक्य होणार आहे. भारताच्या अर्थ टू ऑर्बिट या स्टार्ट कंपनीने इस्रोच्या अँट्रिक्स कॉर्पोरेशनशी परदेशी ग्राहक देशांच्या वतीने कंत्राटाच्या वाटाघाटी केल्या आहेत. इस्रोचे अध्यक्ष किरणकुमार यांनी सांगितले, की २० उपग्रह एकावेळी सोडणे म्हणजे पक्षी अवकाशात सोडण्यासारखे आहे. या प्रत्येक उपग्रहाचे काम वेगळे आहे, त्यांचा कार्यकाल चांगला आहे, तशी त्यांची रचना केली आहे. इस्रोने याआधी पीएसएलव्हीच्या मदतीने २८ एप्रिल २००८ रोजी १० उपग्रह एकाच वेळी सोडले होते तर अमेरिकेच्या मिनोटॉर १ अग्निबाणाने २९ उपग्रह एकाच वेळी सोडले होते. रशियाच्या डीएनईपीआर अग्निबाणाने एकाच वेळी ३३ उपग्रह सोडले होते. पीएसएलव्ही प्रक्षेपक ३२० टनांचा असून, त्यात कॅनडा, इंडोनेशिया, जर्मन व अमेरिका यांचे १७ उपग्रह आहेत. त्यात भारताचा काटरेसॅट उपग्रह मोठा म्हणजे ७२७ किलो वजनाचा आहे. अधिक स्पष्ट प्रतिमा घेण्यासाठी त्याचा उपयोग आहे. सत्यभामासॅट व स्वयम हे भारताचे दोन शैक्षणिक उपग्रह सोडले जात आहेत.