आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटामधून इस्रोने पीएसएलव्ही-सी३८ यानाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. या माध्यमातून इस्रोने कार्टोसेट-२ मालिकेतील उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. पृथ्वीवरील घडामोडींकडे लक्ष ठेवण्यात कार्टोसेट-२ मालिकेतील उपग्रह महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. कार्टोसेट-२ मालिकेतील उपग्रहासोबतच आणखी ३० उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले. या उपग्रहांचे वजन ३० किलो इतके आहे. एकाचवेळी ३१ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केल्याने इस्रोच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे.

कार्टोसेट-२ मालिकेतील उपग्रहामुळे भारताला सीमावर्ती भागात आणि शेजारी देशांवर नजर ठेवता येणार आहे. यासोबतच स्मार्ट सिटी योजनेतील विविध उपक्रमांसाठीदेखील कार्टोसेट-२ मालिकेतील उपग्रहाची भारताला मोठी मदत होणार आहे. या उपग्रहामुळे ५०० किलोमीटर अंतरावरुनही सीमावर्ती भागात नेमके किती शत्रू सैन्य आणि किती रणगाडे तैनात आहेत, याची माहिती मिळू शकणार आहे. भारताकडे याआधीच अशा प्रकारचे पाच उपग्रह आहेत. कार्टोसेट-२ मालिकेतील उपग्रहासोबतच आणखी ३० लहान उपग्रहांसह पीएसएलव्हीने श्रीहरिकोटामधून यशस्वी उड्डाण केले.

पीएसएलव्ही-सी ३८ च्या माध्यमातून प्रक्षेपित करण्यात आलेल्या कार्टोसेट-२ मालिकेतील उपग्रहाचे वजन ७१२ किलो इतके आहे. तर प्रक्षेपित करण्यात आलेल्या इतर ३० उपग्रहांचे वजन २४३ किलो आहे. त्यामुळे पीएसएलव्ही-सी ३८ ने एकूण ९५५ किलो वजनाच्या ३१ उपग्रहांना घेऊन अवकाशात यशस्वी भरारी घेतली आहे. पीएसएलव्ही-३८ ने भारतासोबतच ऑस्ट्रिया, बेल्जियम, चिली, चेक प्रजासत्ताक, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, लॅटविया, लिथुआनिया, स्लोवाकिया, ब्रिटन आणि अमेरिका या देशांचे एकूण २९ उपग्रह प्रक्षेपित केले आहेत.