भारतीय प्रक्षेपकातून अंतराळात मानव पाठविण्याच्या दिशेने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) गुरुवारी यशस्वी पाऊल टाकले. आतापर्यंतच्या सर्वाधिक वजनाच्या यानाने गुरुवारी श्रीहरीकोटा येथून यशस्वीपणे उड्डाण केले आणि इस्रोने भारतीय अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात नवा इतिहास लिहिला.
तब्बला ६३० टन वजनाच्या जीएसएलव्ही मार्क-३ या यानाने गुरुवारी सकाळी यशस्वीपणे उड्डाण केले. प्रयोग म्हणून करण्यात आलेल्या उड्डाणाने पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केल्यामुळे शास्त्रज्ञांनी आनंद व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या यशाबद्दल शास्त्रज्ञांचे कौतुक केले. शास्त्रज्ञांची बुद्धिमत्ता आणि कठोर परिश्रमांना मिळालेले हे यश असल्याचे त्यांनी ट्विटरवर लिहिलेल्या संदेशात म्हटले आहे.
सतीश धवन अंतराळ केंद्रातील प्रक्षेपक तळावरून गुरुवारी सकाळी नऊ वाजता या यानाने अंतराळाच्या दिशेने झेप घेतली. या प्रायोगिक उड्डाणामध्ये इस्रोने या स्वरुपाच्या उड्डाणासाठी लागणाऱया सर्व चाचण्या घेतल्या. या सर्व चाचण्या यशस्वीपणे पूर्ण झाल्याचे इस्रोने म्हटले आहे. गुरुवारी झालेले उड्डाण मानवरहित होते. उड्डाण प्रायोगिक असल्यामुळे प्रक्षेपणानंतर काहीवेळाने यान बंगालच्या उपसागरात उतरविण्यात आले.