नोटाबंदीच्या निर्णयानंतर एकीकडे लोकांना पैसे मिळवण्यासाठी बँका आणि एटीएमबाहेर धक्के खावे लागत आहेत. तर दुसरीकडे अनेकांच्या घरी जुन्या, नव्या नोटांचा खजिनाच सापडताना दिसत आहे. कर्नाटकातील चित्रदूर्ग आणि हुबळी येथे हवाला व्यापाऱ्याच्या घरी मारलेल्या छाप्यात नव्या २००० रूपयांच्या नोटांचा समावेश असलेले तब्बल ५.७ कोटी रूपये मिळाले. शिवाय ३२ किलो दागिने, ९० लाख रूपये रोख ज्यात ५०० आणि १ हजार रूपयांच्या बंद झालेल्या नोटांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ही सर्व रक्कम बाथरूमध्ये बनवलेल्या गुप्त तिजोरीत ठेवण्यात आली होती.
यापूर्वी आयकर विभागाने बंगळुरू येथे टाकलेल्या छाप्यात दोन अभियंत्याकडे ५.७ कोटी रूपये जप्त करण्यात आले होते. याचपद्धतीने चिकमंगळुरू येथेही ८१ लाख रूपये आणि उडप्पी येथेही ७१ लाख रूपये जप्त केल्या होत्या. यामध्ये २००० रूपयांच्या नव्या नोटा होत्या.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरात आयकर विभाग विविध ठिकाणी छापे मारत आहे. या कारवाईत मोठ्याप्रमाणात जुन्या व आश्चर्यकारकरित्या नव्या नोटा ही मिळत आहेत. शुक्रवारी चेन्नईतील ३ व्यापाऱ्याच्या व्यवसायाच्या ठिकाणी व घरावर टाकलेल्या छाप्यात १६६ कोटी रूपये रोख व १२७ किलो सोने जप्त करण्यात आले होते. जप्त रकमेत १० कोटीहून अधिक रक्कम ही नव्या नोटांच्या स्वरूपात होती.

हैदराबाद येथे सीबीआयने टाकलेल्या छाप्यात पोस्ट विभागाच्या एका अधिकाऱ्याच्या नातेवाईकाकडे ७० लाख रूपयांच्या नव्या नोटा मिळाल्या होत्या. संबंधित अधिकाऱ्याला प्रथम नोटा बदलून देण्यात धोका दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. रंगारेड्डी जिल्ह्यातील इब्राहिमपत्तनम येथेही नव्या २००० रूपयांच्या नोटा मोठ्याप्रमाणात जप्त करण्यात आल्या होत्या. हैदराबाद येथील पोस्ट विभागाच्या एक वरिष्ठ अधिकारी के. सुधीर बाबू यांनी गुरूवारी सीबीआयसमोर समर्पण केल्यानंतर दुसऱ्याच दिवशीपासून हे छापे मारण्यात आले होते.

सुधीर बाबूने २.९५ कोटी रूपये नव्या २००० रूपयांच्या नोटा एका मध्यस्थामार्फत बदलून दिले होते. यापूर्वी सीबीआयने २००० रूपयांच्या १७.०२ लाख रूपये जप्त केले होते. सुधीर बाबूचे दोन लिपिक आणि हैदराबादच्या तीन पोस्टातील अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.