माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तरुणांनी आपल्या हक्कांविषयी लढण्यासाठी कामगार संघटनेची स्थापना केली आहे. तमिळनाडूतील काही नोकरदारांनी स्थापन केलेली ही संघटना माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील पहिलीच संघटना असल्याचे बोलले जाते.

श्रीलंकेमध्ये १० वर्षांपूर्वी एका तमीळ कर्मचाऱ्यावर कामाच्या ठिकाणी अन्याय झाल्याच्या कारणावरुन तेथील स्थानिकांकडून एक मोहीम राबविण्यात आली होती. त्यानंतर जगभरातील विविध देशांमध्ये काम करणाऱ्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी अशा प्रकारची संघटना असावी, असा विचार पुढे आला. या विचाराला आता मूर्त रुप आले असून नुकतीच आयटी कर्मचाऱ्यांनी एकत्र येत संघटनेची स्थापना केली आहे.

भारताच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सध्या साधारणतः २.८ मिलियन कर्मचारी कार्यरत आहेत. देशभरात विविध स्तरावर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी कामगार संघटनेची स्थापना करण्याचा अनेकदा प्रयत्न कऱण्यात आला. मात्र तो यशस्वी झाला नाही. याबाबत संघटनेचे सदस्य जयप्रकाश म्हणाले, राजकीय गोष्टींबाबत मध्यमवर्गात अनेकदा तिटकारा असतो, त्यामुळे आतापर्यंत ही संघटना स्थापन करु शकलेलो नाही.

मात्र मागील काही दिवसांपासून भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर या संघटनेची स्थापना महत्त्वाची मानली जात आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात येत्या काही दिवसांत ४.५ टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. बदलते तंत्रज्ञान आणि डोनाल्ड ट्रम्प यांची परदेशी कर्मचाऱ्यांबद्दल असणारी भूमिका यामुळे ही कपात होणार असल्याचे म्हटले जात आहे. पुढील एका वर्षात इन्फोसिस, विप्रो, कॉग्निझंट यासारख्या कंपन्यांमधील ५ लाख ६० हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अशा प्रकारच्या अनेक विषयांमध्ये एकत्रित लढण्याची आवश्यकता असल्याने संघटनेची स्थापना करण्यात आल्याचे जयप्रकाश म्हणाले. ज्यांना कामाच्या ठिकाणी काही अडचण असल्यास एकत्रितपणे ती सोडविण्यासाठी हे एक चांगले व्यासपीठ असल्याचेही त्यांनी सांगितले.