वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) रचनेत केंद्र सरकारकडून काल महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले. त्यामुळे देशात १५ दिवस आधीच दिवाळी आली आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. ते शनिवारी गुजरातमधील जाहीर सभेत बोलत होते. यावेळी मोदींनी जीएसटी कायद्यात करण्यात आलेल्या बदलांचा दाखला देताना सांगितले की, आज देशातील अनेक वृत्तपत्रांच्या मथळ्यात देशात १५ दिवस आधीच दिवाळीचे आगमन झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे देशातील लोक आनंदित झाले आहेत. जीएसटी कायदा लागू झाल्यानंतर तीन महिन्यांनंतर त्यामध्ये आवश्यक बदल करण्याचे आश्वासन आम्ही यापूर्वीच दिले होते. जेणेकरून कायद्यातील त्रुटी दूर करता येतील. अखेर काल जीएसटी समितीने हे बदल करून सामान्यांना दिलासा दिला, असे मोदींनी सांगितले.

तसेच देशातील लोक सरकारच्या निर्णयांना पाठिंबा देत असल्याचा दावाही त्यांनी केला. जेव्हा लोकांचा सरकारवर विश्वास असतो आणि चांगल्या हेतूने एखादा निर्णय घेतला जातो, तेव्हा लोकांनी त्याला पाठिंबा देणे नैसर्गिक आहे. सध्या देशातील सामान्य जनतेला विकासाचा फायदा त्यांच्यापर्यंत पोहोचावा, असे वाटते. कोणालाही त्यांच्या मुलांनी गरीबीत आयुष्य काढावे, असे वाटत नाही. त्यामुळे अशा लोकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना गरिबीशी लढा देण्यासाठी सरकार मदत करेल, असे आश्वासन मोदींनी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर आले आहेत. आज द्वारकाधीश मंदिरात पुजा केल्यानंतर ओखा आणि द्वारकाला जोडणाऱ्या पुलाचे मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून देशाच्या आर्थिक विकासाच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला विरोधक लक्ष्य करत आहेत. तसेच जीएसटीची व्यवस्थित अंमलबजावणीही झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र, मोदींनी हे सर्व आरोप फेटाळून लावत देश प्रगतीपथावर असल्याचे म्हटले होते.

दरम्यान, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेच्या बैठकीत शुक्रवारी सर्वसामान्यांना दिलासा देत सुमारे २७ वस्तूंवरील कर कमी करण्यात आले आहेत. यामुळे कपडे, आयुर्वेदिक औषधे स्वस्त होणार असून वातानुकूलित हॉटेलमधील जीएसटी १८ टक्क्यांऐवजी १२ टक्क्यांवर आला आहे. जीएसटीत सध्या ५, १२, १८ आणि २८ टक्के असे चार टप्पे असून या चार टप्प्यांमध्ये येणाऱ्या वस्तूंवरील कर कमी करण्याची मागणी होत होती. याशिवाय निर्यातदारांच्या समस्यांवरही तोडगा काढण्याची मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जीएसटी परिषदेची बैठक पार पडली. आयुर्वेदिक औषधांवर १२ टक्के कर होता. मात्र यापुढे आयुर्वेदिक औषधांवर ५ टक्के कर असेल. याशिवाय खाकरा, चपाती, नमकीन पदार्थांवर १२ टक्क्यांऐवजी ५ टक्के कर आकारण्यात येणार आहे. याशिवाय पोस्टर कलरसह अनेक शालेय उपयोगी साहित्यांवर २८ ऐवजी १८ टक्के कर आकारण्यात येणार आहे. प्लास्टिक वेस्ट, रबर वेस्ट आणि पेपर वेस्टवर पाच टक्के कर आकारण्यात येईल. तर आयजीएसटी (इंटरस्टेट) करिता निर्यातदारांना सहा महिन्यांचा दिलासा देण्यात आला. निर्यातदारांसाठी एप्रिल २०१८ पासून ई-वॅलेट सुरु करण्यात येईल, अशी घोषणाही जेटलींनी केली. हातमागावर यापूर्वी १८ टक्के जीएसटी लागू करण्यात आला होता, तो आता १२ टक्क्यांवर आणण्यात आला आहे.