इटलीमधील विनाशकारी भूकंपानंतर बचावकार्य जोमाने सुरू आहे. भूकंप प्रभावित पेस्कारा डेल ट्रॉन्टो परिसरात कोसळलेल्या घराच्या ढिगाऱ्यातून १० वर्षांच्या मुलीस सुखरूप बाहेर काढण्यात बचावकर्त्यांना यश आले. इटलीतील मध्यवर्ती भागात झालेल्या भूकंपात ही मुलगी ढिगाऱ्याखाली दबली होती. १८ तासांपर्यत मृत्यूशी झुंज दिलेल्या या मुलीस सुखरूप बाहेर काढण्यात आले. या भागात जवळजवळ नव्वद टक्के भूकंपग्रस्त मृत्युमुखी पडले असताना ही मुलगी सुखरूप वाचल्याचे बचावकर्त्यांचे म्हणणे आहे. बुधवारी जेव्हा या मुलीला बाहेर काढण्यात आले तेव्हा उपस्थितांमध्ये आनंदाचे वातावरण होते. इटलीत बुधवारी झालेल्या भूकंपात जवळजवळ २४१ लोक मृत्युमुखी पडल्याचे समजते. ६.२ रिश्टर तीव्रतेच्या या भूकंपामुळे सीमाभागातील लाजियो, अम्ब्रिया आणि मार्श भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पेस्कारा डेल ट्रॉन्टो आणि अमार्टिस सह अनेक डोंगराळ भाग नष्ट झाले. भूकंपाचा केंद्रबिंदू रेती राज्याच्या उत्तरेस लाजियोजवळ अकुमोली येथे असल्याचे सांगितले जाते. हा परिसर सुट्टीचा आनंद घेण्यासाठी खूप प्रसिध्द आहे. भूकंपानंतर झालेल्या भूस्खलनामुळे मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बचावकर्त्यांजवळ विशेष उपकरणांची कमतरता असल्याने लोकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू असुनदेखील शोधकर्ते उशिराने पोहोचल्याची काही गावांची तक्रार आहे. भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी इटलीचे पंतप्रधान मातियो रेंजी यांनी गुरुवारी कॅबिनेटची बैठक बोलावली होती.

व्हिडिओ