रॉबर्ट वढेरा यांची लंडनमध्ये बेहिशेबी मालमत्ता असल्याचा आरोप भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केला असताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपल्या जावयावरील सर्व आरोफ फेटाळून लावले आहेत. उगाच खोटे आरोप करून भाजपच्या ‘काँग्रेसमुक्त भारत’ या कारस्थानाचाच हा एक भाग असल्याचे सोनिया म्हणाल्या. मोदी हे पंतप्रधान आहेत, शहेनशहा नाहीत. त्यांनी पंतप्रधानाप्रमाणे वागावे, अशी तोफही त्यांनी डागली.
मी आजवर असा पंतप्रधान पाहिला नाही. मोदी हे पंतप्रधान आहेत की शहेनशहा? देश गरिबी, दुष्काळ आणि शेतकरी अडचणीत असताना सरकार द्वीवर्षपूर्तीच्या सेलिब्रेशनमध्ये मश्गुल आहे, असे सोनिया गांधी रायबरेली या त्यांच्या मतदार संघातील नगर पंचायतीच्या नव्या इमारतीच्या उदघाटनावेळी म्हणाल्या.
रॉबर्ट वढेरांवर केलेले आरोप म्हणजे भाजपच्या सोकॉल्ड ‘काँग्रेस मुक्त भारत’च्या कारस्थानाचाच एक भाग असून, मोदी सरकारमधील दररोज एक मंत्री आमच्यावर असे आरोप करत सुटतो. निपक्षपणे चौकशी करावी. सत्य काय ते समोर येईल, असेही त्या पुढे म्हणाल्या.