कामाची अभिनव पद्धत तसेच वेगवान कार्यशैलीसाठी परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज या ओळखल्या जातात. भारतात तसेच विदेशातही त्यांच्या या कार्यशैलीचे अनेकजण कौतुक करतात. नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवांका ट्रम्प हिने स्वराज यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. सुषमा स्वराज या प्रभावशाली परराष्ट्रमंत्री असल्याचे इंवाकाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.


न्यूयॉर्क येथे सुरु असलेल्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या वार्षिक सत्रात इवांकाने स्वराज यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यात बराच काळ चर्चा झाली. त्यानंतर इवांकाने ट्विटरवर लिहिताना म्हटले, “भारताच्या कुशल व प्रभावशाली परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचा सन्मान करते. त्यांच्याशी भेट होणे ही सन्मानाची बाब आहे.

नोव्हेंबरमध्ये भारतात वैश्विक उद्योजकता शिखर संमेलन (जीईएस) होणार आहे. यावेळी इवांका अमेरिकेचे प्रतिनिधित्व करणार आहे. या पार्श्वभूमीवर तिने स्वराज यांच्याशी दोन्ही देशांतील महिला उद्योजक, त्यांच्या कार्यपद्धती आणि विकासाबाबत चर्चा केली.  भारत आणि अमेरिका २८ ते ३० नोव्हेंबरला हैदराबाद येथे होणाऱ्या जीईएसच्या बैठकीत इवांका सहभागी होणार आहेत. जीईएस ही जगभरात नावलौकिक मिळवणाऱ्या व्यावसायिक, गुंतवणूकदार आणि व्यापारी नेत्यांची वार्षिक सभा आहे.

सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सभेदरम्यान अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन आणि जपानचे परराष्ट्रमंत्री तारो कोनो यांची देखील भेट घेतली. या नेत्यांनी परस्परांच्या सामरिक सुरक्षा, संपर्क आणि प्रसाराच्या मुद्द्यांवर चर्चा केली. यामध्ये भारत, जपान आणि अमेरिकेच्या नागरिकांना एकमेकांच्या देशात प्रवासाचे स्वातंत्र्य, आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आदर करणे आणि जागतिक स्तरावरील वादग्रस्त मुद्द्यांवर शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढणे आदी मुद्द्यांबाबत चर्चा करण्यात आली.