तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि एआयएडीएमकेच्या सर्वेसर्वा जयललिता यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने त्यांचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अखेर सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. मात्र, पक्षाच्या नेत्यांनी रविवारीच जयललिता यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली होती, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांचे निधन आदल्या दिवशीच झाले होते की काय? अशी चर्चा सुरू आहे.

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे निधन सोमवारी रात्री झाल्यानंतर मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जयललिता यांचे पार्थिव ज्या शवपेटीत ठेवण्यात आले आणि दफनविधी करण्यात आला, त्या शवपेटीची ऑर्डर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रविवारीच दिली होती. इतकेच नव्हे तर, त्यानंतर काही वेळाने चेन्नईतील राजाजी सभागृह स्वच्छ करण्याचे आदेश देण्यात आले होते. याच सभागृहात जयललिता यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते, अशी माहिती सरकारी सूत्रांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिली.

सूत्रांच्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास तामिळनाडू सरकारमधील चार मंत्री ओ. पनिरसेल्वम, डी. जयकुमार, के. पंड्याराजन, पी. बेंजामिन यांना जयललिता यांच्या गंभीर प्रकृतीबाबत माहिती देण्यात आली होती. हे चार मंत्री त्यावेळी रुग्णालयात उपस्थित होते. उर्वरित मंत्र्यांना त्यानंतर जयललिता यांच्या प्रकृतीविषयी माहिती देण्यात आली. दरम्यान, जयललिता यांच्या जवळच्या सहकारी शशिकला मात्र, त्यावेळी काही बोलण्याच्या स्थितीत नव्हत्या. जयललिता यांची प्रकृती चिंताजनक होती. उपचारादरम्यान त्यांना डिव्हाइसवर ठेवण्यात आले होते. पण त्यानंतर काही वेळच त्या जिवंत राहू शकल्या, अशी माहितीही सूत्रांनी दिली.

दरम्यान, जयललिता यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले. त्यांचे प्राण वाचवण्यासाठी अपोलो रुग्णालयाच्या डॉक्टरांनी आणि इतर तज्ज्ञांनीही शर्थीचे प्रयत्न केले. पण जयललिता यांनी उपचारांना प्रतिसाद दिला नाही. त्यांनी सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूची अधिकृत घोषणा होण्याच्या आदल्या दिवशीच त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी पक्षाच्या वतीने करण्यात आली होती. त्यांचे पार्थिव दफन करण्यासाठी शवपेटीची ऑर्डर आदल्या दिवशीच देण्यात आली होती. याशिवाय पक्षाच्या कार्यालयावरील ध्वजही अर्ध्यावर उतरवण्यात आला होता. त्यामुळे जयललिता यांचे निधन आदल्या दिवशी म्हणजेच रविवारीच झाले होते का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.