मध्ये प्रदेशमधील जबलपूर जिल्ह्य़ातील  खमरिया येथील दारुगोळा कारखान्यात शनिवारी स्फोट झाला. स्फोटात सहा जण जखमी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शुक्रवारी मध्य प्रदेशच्याच होशंगाबाद जिल्ह्य़ातील इटारसी येथील दारुगोळा कारखान्यात स्फोट झाला होता.

जबलपूरपासून ६ किलोमीटर अंतरावरील हा कारखाना ५० एकरांमध्ये पसरला असून त्याची १९४२ साली स्थापना झाली होती. संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील या कारखान्यात विविध प्रकारचा दारुगोळा तयार होतो. शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कारखान्याच्या एफ-३ विभागातील दरवाजा क्रमांक ७ जवळ जोरदार स्फोट झाला. या ठिकाणी १२५ मिलीमीटर व्यासाचे रणगाडाभेदी गोळे साठवून ठेवले होते. तसेच जवळच्याच इमारत क्रमांक ३२४ मध्ये ८४ मिमी व्यासाचा दारुगोळा अन्यत्र पाठवण्यापूर्वी साठवून ठेवला जात होता. त्यावेळी कर्मचाऱ्यांच्या हातून चुकून दारुगोळा खाली पडून स्फोट झाला असावा असा अंदाज आहे. त्यानंतर अनेक तोफगोळ्यांचा स्फोट झाल्याने परिसर हादरून गेला. अग्निशमन दलाच्या डझनभर बंबांनी रात्री साडेनऊ वाजेपर्यंत आग आटोक्यात आणली.

स्फोटाचा आवाज दूरवरून जाणवला. धुराचे लोटही  दूरवरून दिसत होते. स्फोटानंतर नागरिकांमध्ये धावपळ उडाली. तर इमारतीजवळील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. घटनास्थळावरून निघालेल्या रुग्णवाहिकांवरून सहा जण जखमी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जबलपूरचे जिल्हाधिकारी महेश चौधरी आणि पोलीस अधीक्षक महेंद्रसिंग सिकरवार यांच्यासह लष्करी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.