देशातील जातीवर आधारित आरक्षण हद्दपार केले पाहिजे, असे खळबळ उडवून देणारे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते मनमोहन वैद्य यांनी आज शुक्रवारी केले आहे. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरच वैद्य यांनी असे वक्तव्य केल्याने निवडणुकांमध्ये राजकीय धुरळा उडण्याची चिन्हे आहेत.

आरक्षणामुळे फुटीरतावाद वाढू शकतो. त्यामुळे एका ठराविक वेळेनंतर जातीवर आधारित आरक्षणाचे समूळ उच्चाटन केले पाहिजे, असे ते यावेळी म्हणाले. जयपूरमध्ये झालेल्या लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये ते बोलत होते. सर्वांना समान अधिकार आणि समान शिक्षण मिळाले पाहिजे. त्यामुळे एका विशिष्ट वेळेपर्यंत आरक्षण हद्दपार केले पाहिजे. यावेळी त्यांनी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा दाखला दिला. बाबासाहेब आंबेडकर हे कायम आरक्षणाच्या बाजूने नव्हते. आरक्षणाला त्यांचा कायमच विरोध होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघही आरक्षणाच्या बाजूने नसल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, मनमोहन वैद्य यांनी निवडणुकांच्या तोंडावरच केलेल्या या वक्तव्याने विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत मिळाल्याचे मानले जात आहे. वैद्य यांच्या वक्तव्यावर विरोधक भाजपला कोंडीत पकडण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे उत्तर प्रदेश निवडणुकीत विरोधी पक्षांचे नेते या मुद्दयावर भाजपवर निशाणा साधतील, असे बोलले जात आहे. विशेष म्हणजे यापूर्वी झालेल्या बिहार निवडणुकांआधी सरसंघचालक मोहन भागवत यांनीही आरक्षण हद्दपार करण्याबाबत वक्तव्य केले होते. त्यावेळी राष्ट्रीय जनता दल आणि संयुक्त जनता दलाने हा मुद्दा निवडणूक सभांमध्ये उपस्थित करून भाजपविरोधात वातावरण तयार केले होते. त्यामुळे बिहारमध्ये भाजपला मोठे नुकसान सोसावे लागले होते.