सरकारी कर्मचाऱ्याने भ्रष्टाचारातून कोट्यवधींची माया जमवल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. राजस्थानमधील एका सरकारी अधिकाऱ्याचे प्रताप लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) टाकलेल्या छाप्यात उघड झाले आहेत. त्याने आपल्या नोकरीच्या २० वर्षांच्या कालावधीत १०० कोटी रुपयांहून अधिक संपत्ती जमा केली आहे. मुकेश मीणा असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. जयपूर विकास प्राधिकरणातील कार्यालयीन अधीक्षक असून त्याच्याविरोधात तक्रारीनंतर एसीबीने त्याचे घर आणि कार्यालयावर छापे टाकले.

एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सुरुवातीला मीणाशी संबंधित तीन ठिकाणांवर छापे टाकले. तेथे गेल्यानंतर या सरकारी अधिकाऱ्याशी संबंधित केवळ तीन ठिकाणे नसून ११ ठिकाणे आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांना मिळाली. जयपूरमधील आठ गोदामांचा तो मालक आहे. इतकेच नाही तर जयपूरच्या बाहेर त्याच्या मालकीचे दोन फार्म हाऊस आहेत. मीणाने आपल्या मूळगावी अलिशान घर बांधले आहे. त्याच्याकडे अनेक लक्झरी कार आहेत. त्याच्याशी संबंधित अनेक ठिकाणांवर छापेमारी सुरूच असून, कारवाई पूर्ण झाल्यानंतरच त्याच्याकडील एकूण संपत्तीची माहिती मिळेल. पण आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार ही संपत्ती १०० कोटींहून अधिक असल्याचा अंदाज आहे, असे सूत्रांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याचे घर आणि कार्यालयातून महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. बँकांची माहिती व्यवहारांच्या फायलींचीही तपासणीही केली जात आहे. मीणा जयपूरमधील वादग्रस्त पृथ्वीराज नगर योजनेत अनेक वर्षे कार्यरत होता. या दरम्यान त्याने अवैधरीत्या कोट्यवधींची संपत्ती जमवल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी संबंधित विभागाकडे तक्रारी गेल्यानंतर त्याची बदली करण्यात आली होती.