ज्यांनी मुंबईत बॉम्ब फेकले किंवा संसदेवर हल्ला चढवला अशा लोकांच्या समर्थनार्थ उघड उघड घोषणा दिल्या जात असतील तर जे या गोष्टीशी सहमत नाहीत त्यांच्याकडून काही ना काही ‘वैचारिक प्रतिक्रिया’ उमटणे स्वाभाविक आहे, असे सांगून जवाहलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) आणि हैदराबाद केंद्रीय विद्यापीठ (एचसीयू) च्या विद्यार्थ्यांवरील कारवाईचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी समर्थन केले.

भारत हा अतिशय बळकट लोकशाही असलेला देश आहे. फक्त एकदाच, म्हणजे १९७० च्या दशकाच्या मध्यात थोडय़ा कालावधीसाठी आम्ही लोकशाही गमावण्याच्या जवळ पोहोचलो होतो, असे मेलबर्न विद्यापीठात जाहीर भाषण देण्यासाठी आलेल्या जेटली यांनी प्रेक्षकांच्या प्रश्नांच्या उत्तरात सांगितले.

आणीबाणीच्या काळात एक आंदोलक म्हणून आपल्या आठवणी सांगताना जेटली म्हणाले की, मी १९ महिने कारावासात घालवले असून भाषणस्वातंत्र्याबाबतची आमची बांधिलकी कुणापेक्षाही कमी नाही. आज जेएनयूमधील आंदोलकांना पाठिंबा देणाऱ्यांनीच आणीबाणीचे समर्थन केले होते, अशी कोपरखळी त्यांनी काँग्रेसला उद्देशून मारली. गरिबीशिवाय दहशतवादाचा भारताला मोठा फटका बसला असल्याचे त्यांनी सांगितले.

१९९३ साली घडलेल्या एका घटनेत जवळजवळ ३०० लोक मारले गेले आणि हजारो जखमी झाले. प्रदीर्घ अशा न्यायालयीन प्रक्रियेनंतर आणि खटल्यामागून खटले झाल्यानंतर एक जण दोषी ठरला. अशा माणसासाठी हैदराबाद विद्यापीठात समारंभ आयोजित करून त्याचे समर्थन करण्यात येते, याकडे जेटलींनी लक्ष वेधले.

२००१ सालच्या संसदेवरील हल्ल्यातही ज्या एकाला दोषी ठरवण्यात आले, त्याच्या समर्थकांनी जेएनयू परिसरात उत्सव साजरा केला. या दोन्ही प्रकरणांत कायद्याच्या योग्य त्या प्रक्रियेनंतर, तसेच अनेक अपिल्स व आरोपींच्या सुटकेनंतर दोघे जण दोषी आढळले. मुंबईत बॉम्ब फेकणाऱ्या किंवा संसदेवर हल्ला करणाऱ्यांसाठी तुम्ही घोषणा द्याल आणि भारत तोडणे हा आपला उद्देश असल्याचे म्हणाल, तर नक्कीच याच्याशी सहमत नसलेल्यांकडून काही ना काही वैचारिक प्रतिक्रिया उमटणे अपेक्षित आहे. आणि बहुतांश भारतीय याच्याशी सहमत नाहीत.