सप्टेंबर, २०१० मध्ये येथील जामा मशिदीत गोळीबार करण्यात आला होता. परदेशातील महिलांना अल्पवस्त्र नेसलेल्या अवस्थेत मशिदीत जाताना आपल्याला पाहावले नाही आणि म्हणूनच आम्ही तेथे गोळीबार केला, अशी कबुली कुख्यात दहशतवादी यासिन भटकळ याने पोलिसांकडे दिली आहे. पोलिसांनीच अशी माहिती बुधवारी न्यायालयास सादर केली.
इस्लाममध्ये नमूद केलेल्या तत्त्वांनुसार अल्पवस्त्रे परिधान करून मशिदीत जाण्यास परवानगी नाही. मात्र जामा मशिदीसारख्या धर्मस्थळी अनेक परदेशी महिलांकडून या तत्त्वाचे सर्रास उल्लंघन होताना आपल्याला दिसले. त्याने आपण अधिकाधिक उद्विग्न होत गेलो आणि मशिदीवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला, अशी कबुली भटकळ याने पोलीस तपासात दिल्याची माहिती न्यायालयास देण्यात आली.
पाकिस्तानातून सूचना
दरम्यान, २०१० मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धावरही हल्ला करण्याच्या सूचना पाकिस्तानातून भटकळला देण्यात आल्या होत्या, असा आरोपही या आरोपपत्रात त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
हल्ल्याचे नियोजन
जामा मशिदीच्या तीन क्रमांकांच्या प्रवेशद्वारातून सर्वात जास्त परदेशी व्यक्ती प्रवेश करतात. तसेच या परदेशी पर्यटकांमध्ये, महिलांचा भरणा अधिक असतो. या बाबी लक्षात घेत, याच प्रवेशद्वारापाशी हल्ला करायची योजना यासिम याने आखली आणि १९ सप्टेंबर, २०१० रोजी आपला सहकारी असदुल्ला अख्तर याच्यासह भटकळने गोळीबार केला, तसेच जवळच वाहनतळावर उभ्या केलेल्या एका गाडीत स्फोटकांनी स्फोटही घेऊन आणला. सुदैवाने, या हल्ल्यात कोणी दगावले नाही.
एक कट फसला..
१३ फेब्रुवारी २०१० रोजी पुण्यात जर्मन बेकरीत मोठा स्फोट झाल्यानंतर, १ ऑगस्ट २०१० रोजी पहाडगंज येथील जर्मन बेकरीत स्फोट करण्याचा कटही भटकळ आणि कातिल सिद्दिकी या दोघांनी आखला होता. मात्र कटाची अंमलबजावणी करणाऱ्यांपैकी दोघे जण अपघाती गोळीबारात जखमी झाल्याने हा कट तडीस जाऊ शकला नाही, असेही पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे.