जम्मू-काश्मीरमधील केरन सेक्टरमध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न सैन्याच्या सतर्क जवानांनी उधळून लावला. मंगळवारी सात ते आठ दहशतवादी घुसखोरी करत असताना भारतीय सैन्याने त्यांना रोखले. भारतीय सैन्याच्या सतर्कतेमुळे दहशतवाद्यांना पुन्हा पाकमध्ये पळ काढावा लागला.

केरन सेक्टरमध्ये मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास सात ते आठ दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात होते. त्यांनी भारताच्या हद्दीत प्रवेशही केला होता. मात्र सतर्क जवानांनी दहशतवाद्यांच्या हालचाली टिपल्या. त्यांनी दहशतवाद्यांना रोखण्यासाठी गोळीबारही केला. या दहशतवाद्यांच्या मदतीसाठी पाकिस्तानी सैन्याच्या ‘बॅट’ टीमने भारतीय सैन्याच्या दिशेने गोळीबार केला. मात्र सैन्याच्या चोख प्रत्युत्तरामुळे सर्व दहशतवादी पुन्हा पाकमध्ये पळाले. केरन सेक्टरमध्ये भारतीय चौक्यांवर हल्ला करण्याचा या दहशतवाद्यांचा कट होता असा अंदाज आहे. दहशतवाद्यांमध्ये पाक सैन्यातील ‘बॅट’ टीमचे जवानही असू शकतात, कारण ज्या पद्धतीने दहशतवाद्यांनी प्रत्युत्तर दिले आणि त्यांच्या हालचाली सुरु होत्या यावरुन त्यांना विशेष प्रशिक्षण मिळाले असावे, अशी शक्यताही सूत्रांनी वर्तवली.

केरन सेक्टर या परिसरातून घुसखोरीचे प्रमाण वाढल्याने या भागातील सैन्याच्या पथकाला हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. गुप्तचर यंत्रणाही या भागावर विशेष लक्ष देत असल्याने मंगळवारचा डाव उधळण्यात यश आले असे सांगितले जाते.

पाक सैन्याचे बॅट पथक म्हणजे नेमके काय?
पाकिस्तान सैन्याची बॉर्डर ऍक्शन टीम (BAT) असून ही टीम नियंत्रण रेषेजवळ सक्रीय असते. लपूनछपून छापे टाकणे आणि कोणत्याही मार्गांचा अवलंब करुन भारतीय सैन्याच्या वरचढ कारवाया करणे हे काम ‘बॅट’ पथकाकडे असते.