सीमारेषेवर पाकिस्तानच्या ‘नापाक’ कारवाया सुरूच असून शनिवारी मध्यरात्री पाकने अर्निया सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकच्या गोळीबारात सीमारेषेजवळील गावातील तीन नागरिक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जम्मू-काश्मीरमधील अर्निया सेक्टरमध्ये शनिवारी रात्री पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यात सीमा रेषेजवळील गावात राहणारे तीन नागरिक जखमी झाले. जखमींवर जम्मूतील सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीही अर्निया भागात पाकिस्तानी सैन्याने उखळी तोफांचा मारा केला होता. सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) एसएम बेस, बडवार आणि निक्कोवाल या चौक्यांना पाकिस्तानी सैन्याने लक्ष्य केले होते. या गोळीबारात बीएसएफ कॉन्स्टेबल ब्रिजेंद्र बहादूर हे शहीद झाले होते. ते चेनाज या चौकीवर तैनात होते.

शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असतानाच सीमा रेषेवरील घुसखोरीच्या घटनाही वाढल्या आहेत. शनिवारी कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये सैन्याने घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. जूनपर्यंत सीमा रेषेवर घुसखोरीच्या प्रयत्न केल्याच्या २२ घटना घडल्या होत्या. यात ३४ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.