जम्मू-काश्मीमध्ये दहशतवाद्यांनी आणि फुटीरतावद्यांनी आता सर्वसामान्यांना टार्गेट करायला सुरुवात केली आहे. गेल्या काही घटनांमध्ये दहशतवाद्यांनी प्रशासनातील लोकांवर गोळीबार आणि बॉम्ब टाकल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यातच आजच्या ताज्या घटनेत सत्ताधारी पिपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या (पीडीपी) एका आमदाराच्या घरावर दहशतवाद्यांनी हातबॉम्ब फेकले. मात्र, घरात कोणीही नसल्याने या आमदाराचा व त्याच्या कुटुंबियांचा जीव वाचला.

पोलिसांच्या माहितीनुसार, शोपिया जिल्ह्यातील जियनापोरा भागात राहणाऱ्या एजाज मीर या आमदाराच्या घरावर दहशतवाद्यांनी हातबॉम्ब फेकले. या बॉम्बचे स्फोट झाले मात्र, त्यामुळे कुठल्याही स्वरुपाचे नुकसान झालेले नाही. कारण या घरात मीर आणि त्यांच्या कुटुंबियांपैकी कोणीही नव्हते. मात्र, मालमत्तेचे किरकोळ नुकसान झाले आहे.

हा हल्ला करणाऱे दहशतवादी दुचाकीवरुन आले होते. त्यांना खरतरं या परिसरातील एका पोलीस चौकीवर हा हल्ला करायचा होता. मात्र, त्यांचा नेम चुकल्याने चुकून हे हातबॉम्ब शेजारीच राहत असलेल्या आमदार मीर यांच्या घरामध्ये पडले. जम्मू-काश्मीर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.

पुलवामा जिल्ह्यात काल (बुधवारी) संध्याकाळी हलीम गुज्जर नामक एका विशेष पोलीस अधिकाऱ्याला त्याच्या घरात घुसून काही दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार मारले होते. तसेच ती दिवसांपूर्वी सोपिअन जिल्ह्यातील रमझान शेख नामक एका माजी सरपंचाची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली होती. त्यांचे घरही पेटवून देण्यात आले होते.

राज्यातील नागरिकांवर दहशतवाद्यांकडून हल्ल्याचे प्रमाणही या भागात वाढले आहे. त्यामुळे सरकारकडून काश्मीर खोऱ्यात शांतता नांदावी यासाठी करण्यात येणारे प्रयत्न हाणून पाडले जात आहेत. गेल्या अनेक महिन्यांत जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत.