‘हिज्बुल मुजाहिद्दीन’ या दहशतवादी संघटनेचा मोस्ट वाँटेड कमांडर अब्दुल कयूम नजरला चकमकीत कंठस्नान घालण्यात आले. अब्दुल कयूमवर १० लाख रुपयांचे बक्षीसही होते. आणखी एका टॉप कमांडरच्या मृत्यूमुळे दहशतवादी संघटनांना मोठा हादरा बसला आहे.

जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा डाव सैन्याने मंगळवारी उधळून लावला होता. यात एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले होते. या दहशतवाद्याची ओळख पटली असून अब्दुल कयूम नजर असे या दहशतवाद्याचे नाव आहे. अब्दुलवर १० लाख रुपयांचे बक्षीसही होते. ४३ वर्षीय अब्दुल हा मूळचा बारामुल्ला येथील सोपोरचा निवासी होता. अब्दुल कयूमने हिज्बुल मुजाहिद्दीनला सोडचिठ्ठीही दिली होती. ‘लष्कर- ए- इस्लाम’ या संघटनेचा तो प्रमुखही होता. अब्दुल कयूम वयाच्या १६ वर्षी दहशतवादी संघटनेत भरती झाला. १९९२ मध्ये त्याला अटक झाली होती. मात्र त्यानंतर तो तुरुंगातून सुटला. १९९५ मध्ये तो पुन्हा दहशतवादी कारवायांमध्ये सक्रीय झाला. २०१४ मध्ये हिज्बुलचे नेतृत्व आणि अब्दुल कयूममध्ये दुरावा निर्माण झाला. अब्दुल कयूमच्या गटाकडे दुर्लक्ष आणि हुर्रियतच्या नेत्यांविरोधातील भूमिका यावरुन अब्दुल कयूमचे संघटनेच्या प्रमुखांशी मतभेद होते. यात भर म्हणजे अब्दुलने संघटनेच्या प्रमुखांकडे आणखी पैशांची मागणी केली आणि शेवटी त्याची संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. अब्दुलला कोणावरही विश्वास नव्हता, सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर येऊ नये यासाठी तो तंत्रज्ञानाचाही फारसा वापर करत नव्हता अशी माहिती समोर आली आहे. सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी तो वेशभूषा बदलत राहायचा. टॉप कमांडरच्या मृत्यूमुळे जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी संघटनांना मोठा हादरा बसल्याचे सुरक्षा तज्ज्ञांचे मत आहे.