सीमा रेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच असून सोमवारी सकाळपासून पाकिस्तानने दोन वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकच्या गोळीबारात एक जवान शहीद झाला असून सीमारेषेवरील गावात राहणाऱ्या सात वर्षांच्या चिमुरडीचाही या गोळीबारात मृत्यू झाला आहे.

जम्मू- काश्मीरमध्ये सोमवारी सकाळपासून पाकिस्तानने दोन वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. राजौरी सेक्टरमध्ये पाकच्या गोळीबारात सैन्यात नाईकपदावर काम करणारे मुद्दासह अहमद हे शहीद झाले. अहमद हे जम्मू- काश्मीरच्या त्राल भागातील रहिवासी होते. अहमद यांना दोन मुले आहेत. पूंछमध्येही पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात सात वर्षांच्या साजिदा काफीलचा मृत्यू झाला. पूंछमधील बालाकोट येथे साजिदा आणि तिचे कुटुंबीय राहत होते.

पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचे पडसाद भारत आणि पाकच्या लष्करी कारवायांच्या प्रमुखांच्या (डीजीएमओ) बैठकीत उमटले. भारताने बैठकीत शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचा निषेध दर्शवला. सीमारेषेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी सैन्य नेहमीच प्रयत्न करते. पण शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल असे भारताने पाकला ठणकावून सांगितले.