जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांवरील हल्ले सुरुच असून बुधवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी सीआरपीएफ आणि स्पेशल ऑपरेशन ग्रुपच्या तळावर हल्ला केला. या हल्ल्यात एक नागरिक जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शोपियानमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि स्पेशल ऑपरेशन ग्रुपचे (एसओजी) तळ असून या तळावर बुधवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकले. मात्र दहशतवाद्यांचा नेम चुकला आणि ग्रेनेडचा रस्त्यावरच स्फोट झाला. या स्फोटात एक नागरिक जखमी झाला. इश्फाक रशिजद असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेचा पोलिसांनी तपास सुरु केला असून परिसरात शोधमोहीम राबवली जात आहे.

शोपियनमधील घटना ताजी असतानाच श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी पीडीपी नेत्यावर हल्ला केला. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या संबंधीत नेत्याला रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अद्याप या नेत्याचे नाव समजू शकलेले नाही.