जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा लष्करी तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. कुपवाड्यामधील पंझगाममधील लष्करी तळाला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले असून या हल्ल्यात सैन्याचे तीन जवान शहीद झाले आहेत. सुरक्षा दलाच्या जवानांनी हल्ला करणाऱ्या दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला असून लष्करी तळाच्या परिसरात आता शोधमोहीम राबवली जात आहे.

कुपवाड्यामधील पंझगाम येथे लष्करी तळ असून या तळावर सैन्याचा दारुगोळा ठेवला जातो. सीमा रेषेपासून हे तळ जवळ आहे. गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास दहशतवाद्यांनी या तळावर हल्ला केला. जवानांनीही दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. सकाळी आठच्या सुमारास सैन्याने चकमक संपल्याचे स्पष्ट केले. या चकमकीत दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती सैन्याच्या प्रवक्त्यांनी दिली. मात्र या हल्ल्यात सैन्याचे तीन जवानही शहीद झाले आहेत. यात एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. तळाच्या एका बाजूला आग लागल्याचे समोर आल्याने परिसरात शोधमोहीम सुरु आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या पाच जवानांना श्रीनगरमधील रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

दरम्यान, पंझगाममधील हल्ल्यानंतर गृहमंत्री राजनाथ सिंह हे आज दिल्लीत गृहमंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्याची शक्यता आहे. या बैठकीत जम्मू काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेवर चर्चा होणार आहे.