जम्मू काश्मीरमधील पुलवामामध्ये पोलिसांच्या गस्तीपथकावर रविवारी दुपारी दहशतवाद्यांनी हल्ला केला. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले असून संपूर्ण परिसराला सुरक्षा यंत्रणानी वेढा घातला आहे. परिसरात संध्याकाळपर्यंत शोधमोहीम सुरु होती.

जम्मू काश्मीरमधील पुलवामा आणि अवंतीपोरामधील पोलीस अधीक्षक रईस अहमद, झाहीद मलिक तसेच जिल्ह्यातील अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंदन कोहली हे तिघे जण गस्तीपथकासोबत जात होते. यादरम्यान गाडीने आलेल्या दहशतवाद्यांनी पोलिसांच्या ताफ्यावर गोळीबार केला. पोलिसांनीही तात्काळ दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिले आणि दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. पोलिसांनी दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्र ताब्यात घेतली असून दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे असे पोलिसांनी सांगितले. दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काश्मीर दौऱ्याला एक आठवडा असताना पुन्हा एकदा दहशतवादी कारवाया वाढल्याचे दिसते. उधमपूरमध्ये सर्वात मोठ्या बोगद्याचे मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर गेल्या २४ तासांत दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची ही दुसरी घटना घडली आहे. शनिवारी रात्री उशीरा दहशतवाद्यांनी तावी पुलावरुन एका पोलिसाकडून एके ४७ घेऊन पळ काढला होता. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली असून त्याची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. मसरुल अहमद असे या संशयित दहशतवाद्याचे नाव असून तो मूळचा शोपियनचा रहिवासी आहे. मसरुल हा आसिफ नामक साथीदारासोबत घटनास्थळी आला होता. या दोघांनी तावी पुलाजवळ पोलीस कॉन्स्टेबल मोहम्मद हनिफ यांच्याकडून एके ४७ घेऊन पळ काढला. दहशतवाद्यांनी हनिफ यांच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने प्रहार केला आणि डोळ्यात मिरचीची पूड फेकून शस्त्रास्त्र पळवली होती.