काश्मीर खोऱ्यात दगडफेक करणाऱ्यांना रोखण्यासाठी स्थानिक तरुणाला जीपसमोर बांधणाऱ्या मेजर गोगोईंचा लष्कराने सन्मान केल्यानंतर येथील राजकीय वातावरण तापले आहे. गोगोईंच्या सन्मानाला नॅशनल कॉन्फरन्सने विरोध केला आहे. पक्षाच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यांवर निदर्शने केली. श्रीनगरमध्ये महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलाच्या जवानांवर दगडफेक केल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे सुरक्षा दलांची चिंता वाढलेली आहे. त्याचवेळी या दगडफेकीच्या घटनांचा निपटारा करण्यासाठी सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी जीपसमोर स्थानिक तरुणाला बांधल्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर काश्मीरमधील अनेकांनी सुरक्षा दलांवर टीका केली होती. तर भारतीय लष्कराने तरुणाला जीपला बांधणाऱ्या मेजर गोगोईंचा सन्मान केला. गोगोई यांनी दहशतवादविरोधी कारवाई केल्याने त्यांना चीफ ऑफ आर्मी स्टाफ कॉमन्डेशन या पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याविरोधात नॅशनल कॉन्फरन्सच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली आहे. श्रीनगरमध्ये रस्त्यावर उतरून जोरदार घोषणाबाजी केली.

दरम्यान, गोगोईंनी विविध स्तरांतून होणाऱ्या टीकेला उत्तर दिले आहे. ९ एप्रिलला बडगाम जिल्ह्यातील उत्लिगम गावात एका मतदान केंद्रावर सुरक्षा दलाच्या पथकाला दगडफेक करणाऱ्या जवळपास १२०० जणांच्या गटाने घेरले होते. त्यावेळी गोळीबाराचे आदेश दिले असते तर डझनभर लोक मारले गेले असते. त्याचदरम्यान, जमावाला चिथावणाऱ्या एका व्यक्तीला पाहिले. त्यामुळे कुणालाही इजा न पोहोचवता निवडणूक कर्मचारी आणि निमलष्करी दलाच्या जवानांना वाचवण्यासाठी एका व्यक्तीला जीपला बांधण्याचा विचार मनात आला, असे गोगोई यांनी सांगितले.