आपले राज्य सोडून गेलेल्या काश्मिरी पंडितांनी परत जम्मू आणि काश्मीरमध्ये यावे यासाठी राज्याच्या विधानसभेनी एकमताने प्रस्ताव मंजूर केला आहे. राज्यात परतण्यासाठी काश्मिरी पंडितांना सुरक्षित वातावरण मिळावे याकरिता प्रयत्न केला जाईल असे विधानसभेत या प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान म्हटले. त्यांच्याबरोबरच ज्या शीख आणि मुस्लीम बांधवांनी काश्मीर सोडले आहे त्यांना देखील परत बोलावले जाईल असे यावेळी म्हटले गेले.

खोऱ्यातील हिंसाचाराला कंटाळून काश्मिरी पंडितांनी आपले घर सोडून २७ वर्षे उलटली आहे. ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे असे जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले. आपण आपले राजकीय मतभेद बाजूला करू आणि या सर्वांनी स्वगृही परतावे असा प्रस्ताव मंजूर करू असे भावनिक आवाहन अब्दुल्ला यांनी केले. हा प्रस्ताव आवाजी मतदानाने एकमताने मंजूर करण्यात आला. काश्मिरी पंडितांना आज काश्मीरची गरज नाही, परंतु राज्याला काश्मिरी पंडितांची गरज आहे. तेव्हा त्यांनी आपल्या राज्याचा विचार करून परत यावे अशी कळकळीची विनंती जम्मू काश्मीरचे शिक्षण मंत्री नईम अख्तर यांनी केली.

काश्मीरमध्ये बहुविध सांस्कृतिक वातावरण निर्मितीची आवश्यकता आहे. सर्व जाती आणि धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन येथे राहणे आवश्यक आहे तरच काश्मीरमध्ये खऱ्या अर्थाने शांतता नांदेल असे त्यांनी म्हटले. १९ जानेवारी १९९० रोजी जम्मू काश्मीरमधून ६०,००० काश्मिरी पंडितांनी स्थलांतरण केले होते. एका रात्रीत हजारो व्यक्तींवर बेघर होण्याची वेळ आली होती. आमच्याच देशात आम्ही निर्वासित म्हणून राहिलो अशी भावना अभिनेते अनुपम खेर यांनी व्यक्त केली आहे. या विषयावर त्यांनी एक कवितादेखील ट्विटरवरुन शेअर केली आहे.

दहशतवाद्यांनी १९९० मध्ये काश्मिरी पंडितांना हुसकावून लावले. त्यामुळे देशातील वेगवेगळ्या भागात जाऊन राहण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. त्यावेळी सर्व जग शांत बसले होते आता मात्र पंडित शांत बसणार नाहीत या आशयाची ही कविता आहे. आम्हाला आमच्याच घरातून हाकलून लावण्यात आले ती भयाण काळ रात्र कधीच विसरू शकणार नाहीत असे एका काश्मिरी पंडितांने म्हटले. या दिवसाच्या आठवणी कधीच पुसल्या जाऊ शकणार नाहीत असे त्यांनी म्हटले. आजच्या आज खोऱ्यातून निघून जावे अन्यथा परिणाम वाईट होतील अशी धमकी दहशतवाद्यांनी दिली होती. त्यामुळे हजारो जणांना आपले घरदार सोडून वणवण भटकावे लागले होते.