काश्मीरमधील फुटीरतावादी चळवळीचा नेता मसरत आलम याला शुक्रवारी जम्मू-काश्मीर पोलीसांनी अटक केली. मसरत आलम हा कालपासूनच पोलीसांच्या नजरकैदेत होता. सय्यद अली शाह गिलानी यांच्या नेतृत्वात फुटीरवाद्यांनी बुधवारी श्रीनगरमध्ये काढलेल्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकावल्याचे आणि पाकिस्तान समर्थक घोषणा दिल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. मात्र, आपण अशाप्रकारे कोणताच झेंडा फडकावला नसल्याचा दावा त्याने केला होता. माझ्या समर्थकांपैकी काहींनी झेंडा फडकावला असेल तर त्यासाठी मला जबाबदार ठरविण्यात येऊ नये, असे मसरत आलमने सांगितले होते. दरम्यान, हुरियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष सय्यद अली शाह गिलानी यांनाही त्यांच्या घरी नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. मसरत आलम आणि गिलानी यांनी भारतीय लष्कराकडून दहशतवादी समजून मारल्या गेलेल्या काश्मिरी तरूणांच्या हत्येच्या निषेधार्थ त्राल येथे मोर्चाचे आयोजन केले होते. या पार्श्वभूमीवर त्याला अटक करण्यात आल्याचे समजते.