दक्षिण काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील पोलीस ठाण्यातून चार रायफल घेऊन फरार झालेला पोलीस कर्मचारी हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेत सामील झाला आहे. सय्यद नावीद (मुश्ताक) शाह असं त्याचं नाव आहे. त्यानं ‘हिज्बुल’मध्ये प्रवेश केल्याचा दावा संघटनेचा प्रवक्ता बुरहानुद्दीन यानं केला आहे. बुरहानुद्दीनच्या हवाल्यानं केएनएस या स्थानिक वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलं आहे.

वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, नावीद हा काश्मीरमध्ये भारतीय लष्कराविरोधात लढण्याच्या इच्छेनं दहशतवादी संघटनेत सामील झाला आहे. ‘हिज्बुल’चा क्षेत्रीय कमांडर महमूद गझनवी यानं त्याचं स्वागत केलं आहे, अशी माहिती प्रवक्त्यानं दिली आहे. नावीद आणि त्याच्यासह इतर लोकही संघटनेत सामील होण्याच्या तयारीत आहेत. तसंच नावीदच्या धाडसाला सलाम करत आहोत, असं प्रवक्त्यानं म्हटलं आहे. नावीद हिज्बुल मुजाहिदीनमध्ये सामील झाल्याच्या वृत्तानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत कोणतीही माहिती अथवा प्रतिक्रिया दिली नाही. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. दरम्यान, नावीद रायफल घेऊन गायब झाल्यानंतर पोलिसांनी त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. तो २०१२ मध्ये पोलीस दलात भरती झाला होता. दक्षिण काश्मीरमधील शोपियानमधील नाजनीनपुरा येथील नावीद हा चार रायफल घेऊन फरार झाला होता. दहशतवादी संघटनेत पोलीस कर्मचाऱ्यानं सामील होण्याची ही पहिलीच घटना नाही. गेल्या दोन वर्षांत अशा प्रकारची अनेक प्रकरणं समोर आली आहेत.