गायन हे इस्लामी परंपरेला धरून नाही. त्यामुळे गायन आणि संगीत थांबवा, असा फतवा महामुफ्ती बशीरुद्दीन अहमद यांनी काढल्यामुळे काश्मीरमधील किशोरवयीन मुलींनी आपला रॉक बॅंड बंद करण्याचा निर्णय घेतला. बॅंड बंद करण्यासठी सोशल मीडियावर त्यांना धमकावण्याचे प्रयत्न करणाऱयांविरुद्ध आता जम्मू-काश्मीर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या मुलीच्या बॅण्डच्या प्रसिद्धीसाठी फेसबुकवर सुरू करण्यात आलेल्या पेजवर धमकी देणारा मजकूर टाकला होता. ही धमकी देणाऱयांपैकी काही जणांची ओळख पोलिसांनी पटली असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहिती-तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६ अ आणि कलम ५०६ नुसार संबंधितांवर राजबाग येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. एकूण सहा जणांची ओळख पोलिसांना पटली आहे.
बॅंड इन नावाच्या या बॅंडमध्ये नोमा नाझिर आणि अनिका खालिद गिटारवादन तर फराह दिबा ड्रमवादन करायची. बॅटल ऑफ बॅंडस् स्पर्धेच्या त्या विजेत्याही ठरल्या होत्या.