जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात त्रालमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला. पोलीस ठाण्याजवळील वर्दळ असलेल्या बस स्थानक परिसरात गोळीबार आणि ग्रेनेड फेकले. या हल्ल्यात तीन नागरीक ठार झाले असून सीआरपीएफ जवानांसह २० जण जखमी झाले आहेत.

हल्ला झालेल्या ठिकाणी नेहमीच वर्दळ असते. पोलीस ठाण्यापासून काही अंतरावरच हे बस स्थानक आहे. या ठिकाणी दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यानंतर ग्रेनेड फेकले. पोलीस ठाणे हे दहशतवाद्यांचे प्रमुख लक्ष्य होते, असे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात तीन नागरीक ठार झाले आहेत. तर सीआरपीएफ जवान, पोलिसांसह २० जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतांची ओळख पटली आहे. जी.एच. नबी पराग, इक्बाल खान आणि पिंटी कौर अशी त्यांची नावे आहेत. हल्ला झाल्याचे समजताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. जम्मू-काश्मीरचे मंत्री नईम अख्तर हे हल्ला झाला त्यावेळी त्रालमध्येच होते. साधारण पावणेबाराच्या सुमारास ग्रेनेड हल्ला झाला, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी ‘एएनआय’ला दिली.