क्रूरतेसाठी कुप्रसिद्ध असलेल्या पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीम (बॅट) ने एलओसीवर (प्रत्यक्ष नियंत्रण रेषा) याववर्षी तिसऱ्यांदा हल्ला केला. यामध्ये भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाले आहेत. यावेळी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्याचा भारतीय जवानांनी खात्मा केला आहे. शहीद झालेले दोन्ही जवान महाराष्ट्राचे आहेत. यात औरंगाबादचे नाईक संदीप सर्जेराव जाधव (वय ३५) आणि कोल्हापूरचे शिपाई श्रावण बाळकू माने (वय २५) अशी शहीद झालेल्या जवानांची नावे आहेत.

बॅट ही पाकिस्तान लष्कराची अत्यंत क्रूर टीम आहे. या टीमला एलओसी पार करून ३ किमी आत घुसून हल्ला करण्याचे विशेष प्रशिक्षण दिले जाते. सैन्य दलातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुरूवारी दोन वाजता पुंछमध्ये भारतीय लष्कराच्या गस्ती पथकावर बॅटच्या सशस्त्र हल्लेखोरांनी गोळीबार केला. याचदरम्यान पाकिस्तानी चौक्यांमधूनही गोळीबार करण्यात आला. भारतीय गस्ती पथकाच्या प्रत्युत्तरात एक जण ठार झाला.

हल्लेखोर एलओसी पार करून भारतीय हद्दीत सुमारे ६०० मीटर आत आले होते. भारतीय चौक्यांपासून हे अंतर अवघे २०० मीटर इतके होते. एका घुसखोराचा मृतदेह तिथेच पडला होता. दुसरा जखमी घुसखोर पाकिस्तानी चौक्यांकडून होत असलेल्या फायरिंग फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी ठरला.

भारतीय लष्कराने दोन जवान शहीद झाल्याचे सांगितले. बॅटने १ मे रोजी एलओसी पार करून भारतीय हद्दीत घुसून गस्ती पथकावर हल्ला करत दोन जवानांच्या मृतदेहाची विटंबना केली होती.