जम्मू-काश्मीरमध्ये एकाच दिवशी भारताचे दोन जवान शहीद झाले आहेत. सीमा सुरक्षा दलाचा एक जवान तंगधार सेक्टरमध्ये शहीद झाला आहे. दहशतवाद्यांची घुसखोरी रोखताना गोळी लागल्याने या जवानाला वीरमरण आले. यासोबत भारतीय सैन्याचा एक जवान घुसखोरी रोखताना जखमी झाला. याआधी गुरुवारी सकाळी पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला होता. त्यामुळे भारताने एकाच दिवशी दोन जवान गमावले आहेत.

गुरुवारी सकाळी पाकिस्तानी सैन्याने काश्मीरमधील अब्दुलिया क्षेत्रात शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला. यामध्ये सीमा सुरक्षा दलातील जीतेंद्र कुमार यांना वीरमरण आले. याशिवाय या गोळीबारात ६ स्थानिक लोक जखमी झाले होते. भारतीय सैन्याने या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. अर्निया आणि आरएस पुरा सेक्टरमध्ये भारतीय सैन्याने दिलेल्या चोख प्रत्युत्तरात पाक रेंजर्सचा एक जवान मारला गेला, तर एक जवान जखमी झाला. भारतीय सैन्याने २९ सप्टेंबरला पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. यामध्ये आतापर्यंत भारताचे सात जवान शहीद झाले आहेत.

भारताकडून २५-२६ ऑक्टोबरला चापरार आणि हरपाल सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबाराचा निषेध करण्यात आला आहे. ‘पाकिस्तानी सैन्याने राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टर छोट्या शस्त्रांसह भारतीय सैन्याच्या चौक्यांवर गोळीबार केला होता. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन करण्यात आलेल्या या गोळीबाराला भारताने जशास तसे प्रत्युत्तर दिले,’ असे भारताकडून मंगळवारी सांगण्यात आले होते.

गेल्या महिन्यात १८ सप्टेंबरला उरीमध्ये दहशतवादी हल्ला झाला. यानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करत उरी हल्ल्याचा बदला घेतला. भारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानने आतापर्यंत ४२ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. २९ सप्टेंबरला भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राइक करत दहशतवाद्यांचे सात कॅम्प उद्ध्वस्त केले होते. या कारवाईत भारतीय सैन्याने ३८ ते ४० दङसतवाद्यांचा खात्मा केला होता.