जपानमध्ये दक्षिण भागात भूकंपाचे शक्तिशाली धक्के बसले असून, त्यात नऊ ठार तर शेकडो लोक जखमी झाले. अनेक ठिकाणी आगी लागल्या तसेच रस्त्यांना मोठे तडे गेले आहेत. हजारो लोकांनी साडेसहा रिश्टर तीव्रतेच्या धक्क्यानंतर घरातून पळ काढला. नैर्ऋत्येकडील क्युशू बेटांवर रात्री भूकंपाचे धक्के बसले. सिमेंटच्या रस्त्यांनाही तडे गेले. घरेही कोसळली. कारखान्यातील काम थांबले, वेगवान गाडय़ा रुळावरून घसरल्या. कुमामोटो या प्राचीन ठिकाणाचे छप्पर खाली आले. माशिकी येथील कुमामोटो परफेक्चर येथे नोबुयुकी मोरिता यांनी सांगितले, की हा धक्का मोठा होता. जन्मानंतर मी एवढा मोठा भूकंप कधी अनुभवला नव्हता. ते व त्यांची पत्नी यांनी रात्र मोटारीत बसून काढली, कारण घराचे छप्पर कोसळले होते व फर्निचरही पडले होते. मदत कर्मचारी रात्रभर काम काम करीत होते. एका आठ महिन्यांच्या मुलीला ढिगाऱ्यातून जिवंत बाहेर काढण्यात आले. माशिकी येथे मदतकार्य जोरात चालू आहे.