जपानच्या दोन ओलिसांना इसिसने ठार मारल्यानंतर आता त्यांच्या सरकारने मध्यपूर्व व मध्य आफ्रिकेतील दहशतवादाचा सामना करण्यासाठी १५.५ दशलक्ष डॉलरची योजना जाहीर केली आहे.
जानेवारीत ब्रुसेल्स येथे परराष्ट्र मंत्री फुमियो किशिदा यांनी ७५ लाख डॉलरची मदत देण्याचे आश्वासन दिले होते त्याच्या दुप्पट रक्कम जपान आता देत आहे. किशिदा यांनी सांगितले की, जपानच्या दहशतवाद क्षमतेच्या वृद्धीसाठी ही योजना आखली आहे. मध्यपूर्व व आफ्रिकेतील दहशतवादाचा फटका अलिकडे जपानला बसला आहे.
उप परराष्ट्रमंत्री यासुहिडे नाकायामा यांनी सांगितले की, वॉशिंग्टन येथे आपण दहशतवाद विरोधी परिषदेसाठी उपस्थित राहत असून त्यावेळी मदतीचा तपशील दिला जाईल. जपानचे पत्रकार व त्याचा मित्र यांना इसिसने ओलिस ठेवून ठार केले होते.
 पंतप्रधान शिन्झो अॅबे यांनी इसिसचा प्रदेश सोडून येणाऱ्या शरणार्थीसाठी २०० दशलक्ष डॉलरची मदत जाहीर केली होती. ईजिप्त येथे १७ जानेवारीला त्यांनी ही मदत जाहीर केली होती. जपान दहशतवादाला शरण जाणार नाही असे अॅबे यांनी अनेकदा सांगितले आहे. ओलिसांच्या सुटकेसाठी जपानने जॉर्डनची मदत मागितली होती पण इसिसने त्यांची हत्या केली.
आंतरराष्ट्रीय संघटनांच्या माध्यमातून जपान ही मदत वितरित करणार आहे. सीरिया व इराक भागात दहशतवादाविरोधात काम करणाऱ्या संघटनांना ही मदत दिली जाईल.