भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठे जाळे असलेल्या रेल्वेंपैकी एक असून, या क्षेत्रात भारतामध्ये ‘बुलेट ट्रेन’साठी मोठी आर्थिक गुंतवणूक करण्याची जपानची तयारी असल्याचे भारतीय पंतप्रधान आणि जपानी पंतप्रधान यांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे. मुंबई मेट्रो लाइनचा तिसरा टप्पा आणि मुंबई-अहमदाबाद हे अंतर पार करणासाठी बुलेट ट्रेनचा मार्ग अशा दोन्ही प्रकल्पांसाठी अर्थसहाय्य करण्याचे जपानने मान्य केले आहे
एकूण ४२४ अब्ज डॉलरच्या कर्जप्रस्तावांवर उभयपक्षांद्वारे स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यापैकी ७१ अब्ज डॉलरचे कर्ज मुंबई मेट्रो लाइनच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मंजूर करण्यात आले आहे, तर ३५३ अब्ज डॉलरचे उर्वरित कर्ज देशभरातील विविध आठ प्रकल्पांसाठी पुरविण्यात येणार आहे.
भारतात सध्या पायाभूत सुविधांचा विकास करण्याची गरज आहे, तर त्याचवेळी अतीजलद गतीच्या रेल्वे वाहतुकीचे तंत्रज्ञान हे जपानचे शक्तिस्थान आहे. जपानने हे तंत्रज्ञान भारताला पुरविण्याची तयारी दाखविल्याने आपण अत्यंत समाधानी आहोत, असे भारतीय पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी सांगितले.
खास मुंबईकरांसाठी..
*  मुंबई-अहमदाबाद या ५०० कि.मी.च्या रेल्वेमार्गासाठी १००० अब्ज येन इतक्या खर्चाचा प्रस्ताव
*  मुंबई-दिल्ली रेल्वेमार्ग मध्यम जलदगती मार्गात (१६० ते २०० कि.मी. प्रति तास या वेगासाठी अनुकूल) परावर्तित केला जाणार.
*  मुंबई मेट्रो ट्रेनच्या तिसऱ्या टप्प्यासाठी जपान तंत्रज्ञान आणि वित्तसहाय्य पुरविणार