जपानमधील एका मनोविकलांग शुश्रूषा केंद्रात एका चाकूधारकाने हल्ला करून १९ जणांना ठार केले, या हल्ल्यात किमान २५ जण जखमी झाले. त्यातील वीस जणांची प्रकृती गंभीर आहे. जपानमधील अलीकडचा हा सर्वात भीषण हल्ला आहे. हल्ला करणारी व्यक्ती वेल्डिंग करण्याचे काम करण्याच्या उद्योगात आधी काम करीत होती. या २६ वर्षे वयाच्या व्यक्तीने नंतर स्वत: पोलिसात हजर होऊन अधिकाऱ्यांना सांगितले की, अपंगांना ठारच मारले पाहिजे. अधिकाऱ्यांनी हल्लेखोराचे नाव सातोशी उमात्सु असल्याचे म्हटले असून सागामिहारा येथे तो काम करीत होता. टोकियोच्या पश्चिमेला असलेल्या या शहराची लोकसंख्या सात लाख आहे. एनटीव्हीने सांगितले की, या व्यक्तीने पोलिसांना जी माहिती दिली आहे त्यानुसार त्याचा मनोविकलांग केंद्राला विरोध होता.

सकाळच्या वेळी उमात्सु याने मनोविकलांग केंद्राच्या पहिल्या मजल्यावरच्या खिडकीची काच फोडली व नंतर त्याने तेथे शुश्रूषा करणऱ्या कर्मचाऱ्यांना बांधून टाकले व नंतर मानसिक विकलांग व्यक्तींना चाकूने भोसकण्यास सुरूवात केली. एका रूग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार अनेकांना खोलपर्यंत जखमा झाल्या होत्या, त्यांच्या मानेत चाकू खुपसले होते. रूग्णांना मानसिक धक्का बसला होता. ते आता बोलूच शकत नाहीत.

या घटनेनंतर रूग्णवाहिका घटनास्थळी आल्या व अग्निशामक बंबही त्सुकुई यामाउरी केंद्राजवळ आले. ही अतिशय कमी उंचीची एक इमारत होती व त्याभोवती पिवळा टेप लावून सगळ्यांना बाजूला राहण्यास सांगण्यात आले. अग्निशमन प्रवक्तयाने सांगितले की, मृतांमध्ये नऊ पुरूष, १० महिला यांचा समावेश असून ते १८ ते ७० वयोगटातील आहेत. इतर २५ जण जखमी झाले असून त्यातील वीस जण गंभीर जखमी झाले आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, संशयिताला आम्ही ओळखले असून तो पोलिस ठाण्यात शस्त्रासह हजर झाला. उमेत्सु याने पहाटे २.१० वाजता खिडकीची काच फोडून चाकूने भोसकाभोसकी केली, असे योकोहामा येथील पत्रकार परिषदेत शिन्या साकुमा यांनी सांगितले.

हल्लेखोराकडे स्वयंपाकघरात वापरण्याचे चाकू होते व अनेक चाकू रक्ताने माखलेले होते. पहाटे अडीच वाजता पहिला फोन या केंद्रातून आला असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यानंतर अध्र्या तासाने तो पोलिसात हजर झाला, त्यामुळे नेमका घटनाक्रम कळलेला नाही. जपानमध्ये हिंसक गुन्ह्य़ांचे प्रमाण विकसित जगात कमी असताना ही घटना घडली आहे. १९३८ मध्ये एका सशस्त्र व्यक्तीने ३० जणांना तलवार व कुऱ्हाडींनी हल्ले करून ठार केले होते.