इसीसच्या अतिरेक्यांनी दोन जपानी अपहृतांची हत्या केल्याच्या पाश्र्वभूमीवर सीरियात जाऊ इच्छिणाऱ्या पत्रकाराचा पासपोर्ट जपान सरकारने जप्त केला आहे.
सीरियात जाऊ इच्छिणाऱ्या पत्रकारांचे प्राण धोक्यात येऊ नयेत, म्हणून जपान सरकारने प्रथमच अशा प्रकारचा निर्णय घेतल्याचे वृत्त ‘असाही शिंबून’ या वृत्तपत्राने दिले आहे. जपानच्या परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी ही कारवाई केली. मुक्त छायाचित्रकार असलेले ५८ वर्षांचे युइची सुगिमोटो यांनी येत्या २७ फेब्रुवारी रोजी सीरियात जाऊन तेथील संक्रमण शिबिरे तसेच अन्यत्र ठिकाणचे वृत्तांकन करण्याचे ठरविले होते. मात्र, इस्लामिक स्टेटच्या अधिपत्याखालील भागांत प्रवेश करण्याचा आपला इरादा नव्हता, असे त्यांनी सांगितले. सुगिमोटो यांनी याआधी इराक व सीरियामधील संघर्षमय भागात जाऊन अनेक वर्षे वृत्तांकन केले आहे. सरकारच्या या कारवाईबद्दल सुगिमोटो यांनी सौम्य शब्दात आपली नापसंती दर्शविली आहे.