जपानची लोकसंख्या २०१२ या वर्षांत आणखी कमी झाली आहे. लोकसंख्या कमी होण्याचा दर हा २ लाख १२ हजार इतका विक्रमी होता, असे आरोग्य मंत्रालयाच्या अंदाजातून दिसून आले आहे. २०१२ या वर्षांत नव्याने जन्माला आलेल्या बालकांची संख्या सर्वात कमी म्हणजे १० लाख ३३ हजार होती. ही संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत अठरा हजारांनी कमी झाली आहे, असे आरोग्य,कामगार व कल्याण मंत्रालयाच्या पाहणीत दिसून आले आहे.
१ ऑक्टोबर २०१२ रोजी जपानची लोकसंख्या अंदाजे १२.५९५ कोटी होती. जन्माच्या संख्येतून मृत्यू संख्या वजा केल्यानंतर ही संख्या २ लाख १२ हजार इतकी आली. याचा अर्थ लोकसंख्या नैसर्गिकरीत्या कमी होत चालली आहे. २०११ मध्ये हा दर दोन लाख इतका होता.
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ पॉप्युलेशन अँड सोशल सिक्युरिटी रीसर्च या संस्थेने वर्तवलेल्या अंदाजानुसार जपानची लोकसंख्या २०६० च्या सुमारास ८६,७४०,००० इतकी होईल. मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, जपानची लोकसंख्या फार मोठय़ा गतीने कमी होत आहे व तरूण पिढीतील जनसंख्या कमी होत आहे. २००५ पासून जपानची लोकसंख्या कमी होत चालली आहे व मृत्यूची संख्या ही जन्मापेक्षा जास्त असल्याचे २००७ पासून घडत आहे व यावर्षीही हा कल कायम आहे.
२०१२ मध्ये मरण पावलेल्यांची संख्या १२ लाख ४५ हजार इतकी होती. सलग दहा वर्षे ही संख्या दहा लाखांपेक्षा जास्त आहे. २०११ पासून मृत्यू पावलेल्या लोकांची ही संख्या यावर्षी सर्वाधिक आहे. ईशान्य जपानमध्ये सुनामी व भूकंपाने जपानला मोठा हादरा बसला होता. २०११ मध्ये मृतांची संख्या १२,५३०६६ होती. जपानमध्ये कर्करोग, ह्दयविकार, न्यूमोनिया व सेरेब्रोव्हॅस्क्युलर या रोगांमुळे मृत्यू झाले आहेत. एकूण ६० टक्के लोक यामुळे मरण पावले. जपानी स्त्रियांचा जननदर  २०११ मध्ये होता तेवढाच म्हणजे १.३९ राहिला आहे. साधारणपणे दर ३१ सेकंदाने तिथे एका व्यक्तीचा जन्म होतो व दर पंचवीस सेंकदाला एक व्यक्ती मरते.

जपानची लोकसंख्या स्थिती
लोकसंख्या घटण्याचा दर (२०१२)- २ लाख १२ हजार
नव्याने जन्मलेली बालके – १० लाख ३३ हजार (-१८०००)
१ ऑक्टोबर २०१२ रोजी लोकसंख्या- १२.५९५ कोटी
२०६० मध्ये लोकसंख्या अंदाजे- ८६,७४०,०००
२०१२ मध्ये मरण पावलेल्यांची संख्या – १२ लाख ४५ हजार
दर पंचवीस सेकंदाला एक मृत्यू
दर ३१ सेकंदाला एकाचा जन्म