घरात पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानंतर कोमात गेलेल्या भाजपचे माजी नेते जसवंत सिंह यांना कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवण्यात आले आहे. लष्कराच्या रुग्णालयात त्यांच्यावर शुक्रवारी रात्री महत्त्वाची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्यावर डॉक्टरांचे एक विशेष पथक सध्या लक्ष ठेवून असल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या वतीने शनिवारी सांगण्यात आले.
सिंह यांची प्रकृती सध्या स्थिर असली तरी ते अद्याप कोमातून बाहेर आलेले नाहीत. गुरुवारी रात्री घरी पडल्यानंतर ११च्या सुमारास ७६ वर्षीय सिंह यांना लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सिंह हे एनडीएच्या सरकारमध्ये संरक्षणमंत्री होते. त्यानंतर त्यांनी परराष्ट्र व्यवहारमंत्री म्हणून काम पाहिले आहे. बारमेरमधून अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवण्याच्या त्यांच्या निर्णयानंतर भाजपमधून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती.